नवी दिल्ली, ९ ऑक्टोबर २०२०: पब्जी गेमने भारतातल्या अनेक तरुणांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले होते. अशातच जर तुम्ही पबजी गेमचे चाहते असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतीय कंपनी एअरटेल आणि पबजी मोबाईल मध्ये वाटाघाटी सुरू असल्याची माहिती आहे. जर यांची चर्चा यशस्वी झाली तर पबजी मोबाईल गेम लवकरच भारतीय बाजारात पुन्हा आगमन करेल अशी आशा सर्वत्र व्यक्त केली जात आहे.
एन ट्रॅकर या इंग्रजी टेक वेबसाईटच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, भारतीय दूर संचार कंपनी रिलायन्स जियो सोबत बोलणी अयशस्वी ठरल्यानंतर पब्जी कॉर्पोरेशन आता भारतीय कंपनी एअरटेल सोबत चर्चा करीत आहे. एअरटेल आणि पब्जी मोबाईल गेम यांची कथित चर्चा ही सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे.
सेन्सर टॉवरने दिलेल्या अहवालावरून पबजी डाऊनलोड करण्यात मोठ्या प्रमाणावर घट आली आहे. सप्टेंबर महिन्यात पब्जी मोबाईल गेमचे जागतिक डाऊनलोड १४.६ दशलक्ष इतके होते. ते आता २६.७ टक्क्यांनी घसरून १०.७ टक्क्यांवर आले आहे. गेल्या महिन्यात आणखी एका अहवालात म्हटले आहे की, पबजी आणि रिलायन्स जियो यांच्यात पबजी भारतात परतण्याबाबत चर्चा होती. येत्या काही दिवसात या चर्चेला पूर्णविराम लागेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे