सोलापूर, ११ ऑक्टोंबर २०२०: देशात २४ मार्च पासून लॉक डाऊन घोषित करण्यात आलं होतं. तेव्हापासून सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. त्यात लग्न समारंभ चा देखील समावेश होता. या दरम्यानच्या काळात अनेक लग्न साध्या पद्धतीनं घराच्या आतच करण्यात आली. मात्र, याचा फायदा अनेक कुटुंबांनी बाल विवाह करण्यासाठी घेतला आहे. लोक डाऊन च्या काळात बालविवाहाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं समोर आलं आहे.
बालविवाह विरोधात सरकारनं अनेक कायदे बनवले आहेत. मात्र, तरीसुद्धा ग्रामीण भागातून अशा प्रकारांसाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. लॉक डाऊनच्या काळात ओढवलेली आर्थिक परिस्थिती आणि पुढील संभाव्य खर्च यातून आपल्यावरील जबाबदारी कमी करण्यासाठी मुलींचं १२ ते १७ वयातच विवाह लावून देण्याच्या प्रमाणात मार्च ते सप्टेंबर या काळात वाढल्याचं निरीक्षण महिला आणि बालविकास अधिकाऱ्यांनी नोंदविलं.
विशेष करून ग्रामीण भागात हे प्रकार जास्त घडतात. कायद्यानुसार १८ वर्षाखालील मुली व २१ वर्षाखालील मुलं यांचा विवाह लावून देणं गुन्हा आहे. मात्र, गेल्या पाच ते सहा महिन्यात याचं प्रमाण वाढलेलं दिसून आलं आहे. २०१९ च्या आकडेवारीशी याची तुलना केली तर ७८.३ टक्के इतकी वाढ झाल्याचं धक्कादायक सत्य राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्रालयानं जाहीर केला आहे.
गेल्या वर्षी १२० बालविवाह रोखण्यात महिला आणि बालकल्याण विभागाला यश आले होते. यंदा करोनाकाळात २१३ बालविवाहाचे प्रकार समोर आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेने ते रोखले. पण समोर न आलेल्या बालविवाहांची संख्या याहून मोठी असण्याची भीती सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे