बारामती, १४ ऑक्टोबर २०२०: सलग बरसात असणाऱ्या अतिवृष्टीमुळे मोरगावसह आसपासच्या परिसरात सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. अतिवृष्टीमुळे पवारवाडी (ता. बारामती) येथील पाच
घरांमध्ये पाणी शिरल्याने घरासमोर जनावरे, गाड्या पाण्यात  होत्या. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मोरगांवसह परिसरात सलग दोन दिवस पावसाची संततधार सुरु आहे.

मोरगावसह तरडोली येथे ढगफुटी झाल्याने मोहन पवार यांच्या घरासह पाच ते सहा घरांमध्ये पाणी शिरल आहे. दारातील जनावरांची  वैरण, जनावर, गोठे कोंबड्या, कडबाकुट्टी, ट्रॅक्टर पाण्यात आहेत.  यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पवारवाडी येथून पुढे लोणी भापकरला जाणाऱ्या रस्त्याच्या बाजुला गटार न काढल्याने पावसाचे पाणी घरात जात असल्याची घटना वारंवार घडत आहे.

रविवारी (दि. ११) तरडोली हद्दीतील वडाचामळा येथील तीन घरांत ओढ्याचे पाणी गेले असल्याची घटना ताजी असतानाच आज पवारवाडी येथील घरात पाणी गेले. मात्र शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींनी साधी विचारपुसही केल्याची खंत येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव