हर्षवर्धन पाटलांनी केली इंदापूर शहरातील पूर परिस्थितीची पाहणी

इंदापूर, १५ ऑक्टोबर २०२०: इंदापूर शहरात बुधवारी (दि. 14 ऑक्टो.) मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन अनेक भागात, घरामध्ये, दुकानांमध्ये, पाणी गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज गुरुवारी (दि.15) या भागाची पाहणी करून नागरिकांना दिलासा दिला. शासनाने नुकसानीचे पंचनामे करीत बसण्यापेक्षा तात्काळ मदत करावी, अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘काल दिवसभर व रात्री इंदापूर शहरात व तालुक्यांमध्ये आकडेवारीनुसार सुमारे 166 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. इंदापूर तालुक्यात आज पर्यंत एवढा कधीही पाऊस झाला नव्हता. या मोठ्या पावसाने रस्ते वाहून गेले, अनेक घरात, दुकानात पाणी शिरले आहे. वीजपुरवठा खंडित झाला आहे. संपूर्ण दळणवळण ठप्प झाले आहे. अजूनही पाणी येत आहे. तातडीची परिस्थिती निर्माण झाली आह. त्यामुळे आमची सरकारला आणि प्रशासनाला मागणी आहे की बाधित कुटुंबांना मदत दिली पाहिजे. वेळ न लावता ही सुविधा उपलब्ध करून द्यावी. अनेकांना राहायला जागा नाही, अशी परिस्थिती आहे.

त्याचबरोबर शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. शेत जमीन वाहून गेली आहे. पिके वाहून गेली आहेत. बऱ्याच ठिकाणी काढलेले धान्य देखील खराब झाले आहे. फळबागांचे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात उभारलेले शेततळे वाहून गेली आहेत. पाझर तळे फुटले आहेत. अगोदरच शेतकरी हैराण झाला होता. त्यात या संकटामुळे त्याचे अजुन अधिक नुकसान झाले आहे. 65 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला तर अतिवृष्टी म्हणून जाहीर केली जाते. आता त्यापेक्षा काल दुप्पट पाऊस झाल्याने प्रशासन, जिल्हाधिकारी, नगरपालिका या सर्वांनी या कामांमध्ये मदत केली पाहिजे.

हवामान खात्यानुसार येत्या दोन दिवसांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता आहे शक्यतो नागरिकांनी घराबाहेर पडू नये. सरकारने तातडीने मदत करण्याची आवश्यकता आहे. स्थलांतरित कुटुंबाची राहण्याची, निवाऱ्याची अन्नधान्याची व्यवस्था केली जाईल. शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा. सामान्य नागरिकांना या समस्येतून दिलासा देण्याचे काम करावे. इंदापूर नगरपालिका नागरिकांना नागरी सुविधा उपलब्ध करून देत आहे. छोट्या दुकानदारांना मदतीची आवश्यकता आहे.

यावेळी इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन, नगरसेवक भरत शहा, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, गटनेते नगरसेवक कैलास कदम, भाजप शहराध्यक्ष शकील सय्यद, माजी नगरसेवक गणेश महाजन, शेखर पाटील, पांडुरंग शिंदे, तसेच गुड्डू मोमीन, प्रशांत उंबरे आणि मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यावेळी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा