कदम वाकवस्ती येथे परतीच्या पावसाने पाणी शिरले; शेतपिकांचे मोठे नुकसान

कदम वाकवस्ती, दि. १५ ऑक्टोबर २०२०: गेल्या दोन ते तीन दिवसांपासून लागलेल्या सततच्या पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतात काढणीयोग्य झालेली भाजीपाल्याची पिके म्हणजे मेथी, कोथिंबीर, पालक, शेपू सततच्या पावसाने पिवळी पडू लागली आहेत. त्याचप्रमाणे काढणीयोग्य होऊनही चिखलामूळे काढता येत नाहीत. तसेच भेंडी ,गवार, वांगी, दोडका, कारली यासारखी तोडमालाची पिके सततच्या पावसाने खराब होऊन पिवळी पडली आहेत.

जोरदार पावसाने फुल व फळाची गळती होत आहे. परीणामी माल सापडत नाही तसेच धार्मिक कार्यक्रम, लग्न समारंभ, तसेच मंदिरे बंद असल्याने फुलांना मागणी नसल्याने फुल उत्पादक शेतकऱ्यांचेही कंबरडे मोडले आहे. उसाचे पिक पूर्ण वाढ झाल्याने आणि सततच्या वारा आणि पाऊस यामुळे भुईसपाट झाल्याने वजनात मोठी घट येण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत. शेतकऱ्यांचे आर्थिक परिस्थिती ढासळली आहे.

एकतर कोरोनामूळे गेल्या सात आठ महिन्यांपासून मोठ्या अडचणीत सापडलेला शेतकरी आता आधिकच अडचणीत सापडला आहे. कोरोना काळात शेतकऱ्यांनी केलेली पिके अक्षरशः बाजारपेठा बंद असल्याने नांगरून टाकावी लागली साधा उत्पादन खर्चही वसुल झाला नाही. अशातच पुन्हा शेती उभी करायची कशी अशी परीस्थिती असतानाच नव्याने कर्जे काढून शेतकऱ्यांनी कशीबशी आपली शेती उभी केली आणि आता पिके काढण्यासाठी आली असतानाच परतीच्या पावसाने जोरदार सुरुवात केल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

या पावसाने पिके जाऊनही आता जमिनीला एक महीनाभर तरी वाफसा होण्याची शक्यता नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला दैनंदिन खर्च चालवायचा कसा तसेच परत शेती उभी करण्यासाठी भांडवल आणायचे कोठून अशा विवंचनेत शैतकरी सापडले आहेत. शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, तसेच शेतकऱ्यांनी घेतलेले संपूर्ण कर्ज माफ करून सातबारा कोरा करुन पुन्हा नवीन कर्ज द्यावे अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा