पुणे, १९ ऑक्टोबर २०२०: कांद्याच्या पट्टीचे आलेले ३ लाख ५९ हजार रुपये रकमेसह मोबाईल चोरीला गेल्याचा बनाव रचणाऱ्या ट्रक चालकाचा बनाव वडगाव निंबाळकर पोलिसांनी उघडकीस आणला व त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच स्वतःजवळ ठेवलेली रोख रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. चोरीचा बनाव करणाऱ्या आरोपीचे शिवाजी बाळासाहेब ठोंबरे (रा. गिरीम, ता. दौंड) ट्रक चालकाचे नाव आहे.
या चोरीच्या बनाव प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनमध्ये अंकुश एकनाथ खताळ (रा. गिरीम) या कांद्याच्या एजंटने फिर्याद दाखल केली होती. दि. १७ आॅक्टोबर रोजी रात्री ही घटना घडली. दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्रपणे २१० कांद्याच्या पिशव्या कोल्हापूर मार्केट यार्डामध्ये ट्रकमधून (एमएच-१३ आर-२७२७) मधून ठोंबरे याच्याकडे दिला होता. सोबत शिवाजी तलवार व गुलाब घुले हे दोघेजण गेले होते. कांदा विक्री झाल्यानंतर हे शेतकरी गिरीम येथे परतले. कांद्याची पट्टी घेण्यासाठी ठोंबरे याला सांगितले होते. ठोंबरे याने दि. १७ रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास पोलिसांना निरा ते मोरगाव रस्त्यावर मला काळ्या रंगाच्या स्काॅर्पिअो गाडीने थांबवून चार व्यक्तिंनी माझ्याकडील ३ लाख ५९ हजार रुपयांची कांद्याची पट्टीची रक्कम व मोबाईल घेऊन ते निरा बाजूकडे गेले असल्याचे सांगितले.
ही माहिती मिळताच पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख, अप्पर अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी आदेश देत पुणे जिल्ह्यात तसेच लोणंद येथे नाकाबंदी केली. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे, उपनिरीक्षक श्रीगणेश कवितके, सहाय्यक फौजदार जाधव, सलमान खान, साळुंके, पिसाळ, कुंभार, गरुड, पोलिस उपनिरीक्षक गोरे, हवालदार अनिल काळे, रवीराज कोकरे, शिरसट यांनी घटनास्थळी धाव घेत स्काॅर्पिअोचा शोध घेत चोरट्यांबाबत माहिती घेतली.
लोणंद- निरा मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले परंतु असे वाहन कुठेच आढळले नाही. ट्रकचालक हा दुपारी कोल्हापूर येथून निघाल्याचे सांगत होता. परंतु त्याला पोहोचण्यासाठी लागलेल्या वेळेमुळे पोलिसांना संशय आला. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने ट्रकच्या केबिनमधील साऊंड बाॅक्समध्ये कांद्याच्या पट्टीची रक्कम व मोबाईल ठेवल्याचे काबुल करत त्यानेच ट्रकची काच फोडत चोरीचा बनाव रचल्याचे कबुल केले.
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव