नंदुरबार, २१ ऑक्टोबर २०२०: मृत्यूचा सापळा झालेलल्या नागपूर सुरत मार्गावरील कोंडाईबारी घाटात बुधवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. प्रवाशांनी भरलेली एक ट्रॅव्हल बस खोल दरीत कोसळल्याने मोठा अपघात घडून यात पाच जणांचा मृत्यू झाला, तर ३५ प्रवासी जखमी झाले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील खामचौंदर गावाजवळ हा भीषण अपघात घडला आहे. बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. तर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
बुधवारी जळगावहून सुरतला जाणाऱ्या बसला हा अपघात झाला. या बसमधील बहुतांश प्रवासी हे जळगाव जिल्हायतील आहेत. तर, ही अपघातग्रस्त बस गुजरात पासींगची असल्याचं कळत आहे. या अपघातामधील मृतांची संख्या वाढण्याची भीती देखील वर्तवली जात आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. या अपघातामुळं नजीकच्या परिसरात एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं.
सदर अपघाताविषयी माहिती मिळताच पोलीस आणि बचावदलानं घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांपर्यंत मदत पोहोचवली. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. ज्यावेळी ही बस जवळपास ४० फूट खोल दरीत कोसळली. अपघाताचं स्वरुप पाहता यात काहींना आपला जीव गमवावा लागला. तर, गंभीर जखमींचा आकडाही चिंतेत टाकणारा आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे