कांदा नव्वदी पार… आगामी काळात दर कायम राहणार

मुंबई, २१ ऑक्टोंबर २०२०: परतीच्या पावसाचा फटका कांद्याला बसल्याने नव्या कांद्याचा हंगाम लांबणीवर पडला आहे. परिणामी, बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. चांगल्या प्रतीच्या जुन्या कांद्याचे भाव वाढत आहेत. ही दरवाढ आणखी महिनाभर राहील, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दसरा आणि दिवाळीच्या सणात काद्याचा भाव चढाच राहण्याचा व्यापाऱ्यांनी अंदाज व्यक्त केला आहे.

दरम्यान मुंबई बाजार समितीत कांदा ९० रुपये किलो झाला आहेत. तर किरकोळ बाजारात कांदा शंभरीपार गेला आहे. परंतू इराणमधून ६०० टन कांदा आयात करण्यात आला आहे. हा कांदा बंदरात दाखल झाला आहे. त्यापैकी २५ टन कांदा येथील बाजार समितीमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे कांद्याचे दर कमी होणार की वाढणार, याचीच उत्सुकता आहे. इराणी कांद्याचा दर ५० ते ६० रुपये असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

यापूर्वी मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेत दोन दिवसांपूर्वी ४५ ते ५० रुपयांवर असलेला कांद्याचा घाऊक दर सोमवारी ६५ ते ७० रुपयांवर पोहोचला. त्यामुळे किरकोळ बाजारातील कांद्याचा दर ७० ते ९० रुपये झाला. पुण्यात किरकोळ बाजारात जुना कांदा प्रतवारीनुसार ५० ते ७० रुपये किलोवर गेला होता. डिसेंबपर्यंत कांद्याचे दर तेजीत राहतील, असे जाणकारांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा