पुरंदर, २१ ऑक्टोबर २०२०: कानिफनाथ गडावर जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न येत्या १५ दिवसात मार्गी लावू, असे आश्वासन पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी नवनाथ देवस्थान ट्रस्टचे संचालक दिपक फडतरे यांना दिले आहे. प्रत्यक्ष सुरु झालेले काम वन विभागाच्या आक्षेपामुळे बंद पडले आहे. ही बाब देवस्थान ट्रस्टने आमदारांच्या लक्षात आणून देताच जगताप यांनी ट्रस्ट संचालकांना कायदेशीररीत्या काम नक्की सुरु होईल, असा विश्वास दिला आहे.
पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध कानिफनाथ गडावर नाथ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक हे येत असतात. मात्र गडावर जाणाऱ्या रस्त्याची आता दुरावस्था झाली आहे. हा रस्ता लॉकडाऊनच्या काळात दुरुस्त व्हावा, जेणेकरून पुन्हा मंदिर आणि देवस्थान सुरु झाल्याने भाविकांना खराब रस्त्याचा त्रास होणार नाही, अशा आशयाचा पत्र व्यवहार नवनाथ देवस्थान ट्रस्टने वनविभागाला(सासवड )केला आहे.
4 ऑक्टोबरला रस्त्याचा कामाला देवस्थान आणि भाविकांच्या मदतीने सुरवात झाली होती. मात्र ही जागा वनक्षेत्राच्या अधिकाराखाली येत असल्याने वन विभागाने यावर आक्षेप घेत काम थांबवले होते. मात्र हे काम पुन्हा सुरु व्हावे यासाठी नवनाथ ट्रस्टचे संचालक दीपक फडतरे यांनी तालुक्याचे आमदार संजय जगताप यांना पुन्हा पत्र लिहित घडलेल्या प्रकाराचा आढावा दिला व आपण यात लक्ष घालण्याची विनंती केली.
यावर संजय जगताप यांनी प्रकरणात लक्ष घालून लवकरच रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला १५ दिवसात सुरवात होईल, असे आश्वासन दिले. तर वनविभाग रस्ता दुरुस्ती परवानगी (जी आर) शासनाकडून प्रत मागवली आहे. त्यानुसार कायदेशीर बाबी पुर्ण करुन कामास सुरुवात करु, असे आश्वासन दिले असल्याची माहिती दीपक फडतरे यांनी दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे