राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा – खा. प्रतापराव पाटील चिखलीकर

नांदेड, २२ ऑक्टोबर २०२०: अतिवृष्टी मुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे. याचा सर्वात जास्त फटका हा शेतकऱ्यांना बसलेला आहे. या परिस्थितीत नुकसानीची पाहणी करून त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सर्वोतोपरी चालू आहे. अशा मध्येच नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी राज्यातील शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

काल दिनांक २१ ऑक्टोबर २०२० रोजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकसानीची पाहणी करण्याकरिता परभणी जिल्ह्यात आले होते. तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधून होईल ती मदत नक्की करू असे आश्वासन त्यांनी दिले. त्यावेळी, त्यांची नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी परभणी येथे जावून भेट घेतली.

अतिवृष्टी मुळे झालेले नुकसान फार मोठ्या प्रमाणात आहे. खरिप हंगाम हातचा गेला. सोयाबीन, कापूस, उडीद, मुग, ज्वारी अश्या पिकांचे नुकसान झालेले आहे. या संकटकाळात शेतकरी हवालदिल झालेला आहे. तरी, राज्य सरकार कडून आतापर्यंत शेतकऱ्यांना कोणतीही आर्थिक मदत देण्यात आलेली नाही. सगळीकडे नुकसानीची पाहणी करण्याकरिताचे दौरे चालले आहेत. तरी, फक्त सहली प्रमाणे हे दौरे होत असून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे राज्य सरकार करत आहे. त्यामुळे, राज्यातील शेतकऱ्यांना या संकटकाळात बाहेर काढण्यासाठी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा यासाठी सरकारला भाग पाडावे, अशी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून केली.

यावेळी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, भाजपा नांदेड जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, दिलीप कंदकुर्ते, भाजपा जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे आदी उपस्थित होते.

न्यूजअनकट प्रतिनिधी- प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा