परभणी, २२ ऑक्टोबर २०२० :अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, परभणी यांच्या वतीने माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विविध शैक्षणिक मागण्यांना घेऊन निवेदन देण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनता आधीच त्रस्त झालेली आहे त्यात मागील दिवसांत झालेल्या अतिवृष्टी मुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतकरी बांधव हवालदिल झालेले आहेत. आणि याचसोबत, विद्यार्थ्यांची देखील हेळसांड होत आहे. तरी, या परिस्थिती कडे पाहता अभाविप ने देवेंद्र फडणवीस यांच्या कडे निवेदनामार्फत मागण्या केल्या आहेत.
कोरोना आणि अतिवृष्टी मुळे झालेली परिस्थिती पाहता सर्व प्रकारचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे. तसेच, सध्याच्या परिस्थितीत सर्व प्रकारच्या प्रवर्गातील पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मंजूर करून तात्काळ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी. यासोबतच, अंतिम वर्षाच्या परीक्षेमध्ये सर्वत्र जो गोंधळ सुरू आहे, तो थांबवून योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्या. लॉकडाउन हटवल्यानंतर योग्य ती काळजी घेऊन सर्वत्र सर्व व्यवहार सुरू आहेत तर सर्व ठिकाणच्या अभ्यासिका सुरू करण्यात याव्या. संशोधन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे (M.Phil, phd) विद्यावेतन देण्यात यावे. परभणी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यात यावे. तसेच, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या परभणीतील उपकेंद्राचे सक्षमीकरण करण्यात यावे, अशा विविध प्रकारच्या मागण्यांना घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, परभणी ने निवेदन दिले.
यावेळी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश सह मंत्री नागसेन पुंडगे, अद्वैत पार्डीकर, अभिषेक बनसोडे, आदी उपस्थित होते.
न्यूजअनकट प्रतिनिधी- प्रगती कराड