शंभर वर्षात प्रथमच साध्या पद्धतीने साजरा झाला जेजुरी गडावरील दसरा 

पुरंदर, २६ ऑक्टोबर २०२०: संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणारा जेजुरीच्या खंडोबा देवाचा प्रख्यात विजयादशमी उत्सव यंदाच्या कोरोना संकट सावटामुळे भाविकांविनाच पार पडला. शंभर वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच साध्या पद्धतीने दसरा साजरा झाला. त्यामुळे यावर्षी जेजुरी भविकांविना सूनीसुनी दिसत होती. केवळ मानकरी सेवेकरी पुजारी यांच्या उपस्थितीतच यावर्षीचा दसरा पार पडला.

दसऱ्याच्या रविवारी सायंकाळी सात वाजता मानकरी पेशवे यांचा इशारा मिळताच ट्रस्टच्या माध्यामतून फटाकाबाजी रोषणाई उडवीत बंदुकीची सलामी देण्यात आली. जेजुरीतील मोजक्या मानकरी गावकरी ग्रामस्थ गुरव पुजारी आपल्या आपल्या पारंपारिक प्रथा रुढींप्रमाणे लोकवाद्य वाजवत पालखीचे प्रस्थान केले. भंडाऱ्याची उधळण आणि  खंडोबा देवाच्या लोकगर्जनाने संपूर्ण मंदिर परिसर दणाणून गेला होता.

यावेळी देवसंस्थान समिती अध्यक्ष संदीप जगताप, माजी अध्यक्ष राजकुमार लोढा, ॲड. संकपाळ, विश्वस्थ पंकज निकुडे, ॲड. प्रसाद शिंदे, हवेलीच्या पोलीस उपअधीक्षिका पाटील, जेजुरी पोलीस स्टेशनचे अंकुश माने उपस्थित होते. नेहमीप्रमणे गुरव पुजारी यांनी धार्मिक विधिवत कार्य पार पडले. तर घडशी समाजाने वाद्य वाजवली. खंडोबा देव हे अठरा पगड जाती धर्माचे श्रद्धास्थान असल्याने उपस्थित मोजक्या मानकऱ्यांनी आपल्या आपल्या पारंपारिक मानपानाच्या विधी शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार पार पाडल्या. तर जेजुरी गडावरील पालखी आणि कडेपठार जूना गड पालखीची जयाद्रीच्या सुसरटिंगी येथे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मध्यरात्री देंवभेट व आपटापूजन झाले. यावेळी जयाद्री खोऱ्यात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. श्री मार्तंड देवसंस्थानचे उत्तम नियोजन आणि पोलीस प्रशासनाची योग्य शिस्त तर ग्रामस्थांचे सहकार्य यामुळे हा उत्सव चांगल्या पद्धतीने पार पडला.

यंदाच्या या साध्या पद्धतीने  पार पडलेल्या उत्सवात भाविकांची अनुपस्थिती आणि मागील दसऱ्याच्या आठवणींना उजाळा देत होती. तर अनेकांनी या सोहळ्यात सहभाग होता येत नसल्याच्या खंत व्यक्त केली. परंतु कोरोनाचे संकट आणि भाविकांची सुरक्षितता पाहता शासनालाही नाईलाजाने हे पाउल जरी उचलावे लागत आहे. काहीही असो आज सुरक्षित अंतर पाळले तर भविष्यात पुढच्या वर्षीच्या हा सोहळा जोरदार भाविकांच्या उपस्थितीत साजरा करता येईल या भावनेतून लोकांनी घरीच दसरा साजरा करणे पसंद केले.

न्युज अककट प्रतिनिधी :- राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा