इस्लामाबाद, २७ ऑक्टोबर २०२०: टर्की पाठोपाठ आता पाकिस्ताननं देखील फ्रान्स विरोधात आपला मोर्चा उघडला आहे. फ्रान्सचे राष्ट्रपति इमॅन्युएल मॅक्रॉन त्यांनी इस्लाम धर्माविषयी केलेलं वक्तव्य तसंच इस्लामचे प्रमुख पैगंबर यांचं व्यंगचित्र प्रकाशित केल्यामुळं पाकिस्ताननं फ्रान्सचे राजदूत मार्क बेर्टी यांची प्रकर्षानं आलोचना केली.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता जाहिद हाफिज चौधरी यांनी सांगितलं की, फ्रान्सच्या राजदूतांना विशेष सचिवांच्या माध्यमातून एक डोझियर देण्यात आले आहे. इस्लामचे प्रमुख मोहम्मद पैगंबर यांचं व्यंगचित्र आणि फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी केलेलं विधान यासंबंधात पाकिस्ताननं फ्रान्सच्या राजदूतांसमोर विरोध प्रदर्शित केला आहे.
फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी बुधवारी सांगितल होतं की, मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी प्रकाशित केलेलं व्यंगचित्र ते मागे घेणार नाहीत. फ्रान्समधील एका शाळेत सॅम्युअल पेटी नावाच्या शिक्षकानं प्रेषित मोहम्मद यांचं व्यंगचित्र दाखवलं यानंतर त्यांची नुकतीच हत्या करण्यात आली. इस्लामवाद्यांना आपलं भविष्य हवं आहे म्हणून शिक्षकाची हत्या करण्यात आली असल्याचं मॅक्रॉन यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
रेडिओ पाकिस्तानच्या वृत्तानुसार, पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी सोमवारी सांगितलं की, मॅक्रॉन यांचं हे विधान बेजबाबदार आहे आणि यामुळं आणखीन वाद वाढण्याची शक्यता आहे. कुरेशी म्हणाले, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोट्यवधी मुस्लिमांच्या भावना दुखावण्याचा कोणालाही अधिकार नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे