महाराष्ट्र राज्य खाजगी सुतगीरणी संघटनेच्या अध्यक्षपदी आमदार संजयमामा शिंदे

माढा, १ नोव्हेंबर २०२०: महाराष्ट्र राज्यातील खासगी सुतगिरणी संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांची बैठक आज कुर्डुवाडी येथील विठ्ठल कार्पोरेशनच्या कार्यस्थळावर पार पडली. या बैठकीत आमदार संजयमामा शिंदे यांची संघटनेच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

यानिवड प्रसंगी संघटनेचे उपाध्यक्ष व त्रिमुर्ती स्पिनर्सचे उल्हासराव सुर्यवंशी, विराज स्पिनर्सचे किरण तारळेकर, विठ्ठल कार्पोरेशनचे संजय जमदाडे, अरविंद ग्रुपचे शामसुंदर मर्दा, त्रिमुर्ती स्पिनर्सचे भुषण म्हेत्रे, लक्ष्मी काॅटस्पिनचे संजय राठी, औताडे स्पिनर्सचे सुनिल कमते, धनस्मृती स्पिनर्सचे आबासो कोटकर व इंडिया टेरीटाॅवेलससह अनेक सुतगिरणीचे प्रतिनिधी उपस्थिती होते.

आमदार संजय शिंदे म्हणाले,  राज्यात १३० सहकारी सुत गिरण्या असुन त्यातील ६०/७० टक्केच्या आसपास सध्या उत्पादनाखाली आहेत. तर ९० ते ९५ खाजगी सुत गिरण्यामध्ये  सुमारे १९ लाख चात्या सुरु असुन त्यात जवळपास पांच हजार कोटी रुपयाची गुंतवणुक झालेली आहे. या खासगी सुतगिरण्या गेल्या चार वर्षापासुन वस्त्रोद्योगातील मंदी ,कापसाच्या दरातील चढउतार तसंच केंद्र व राज्य शासनाच्या काही चुकिच्या धोरणांमुळं प्रचंड अार्थिक अडचणीत असुन बॅंकांची  कर्जे थकल्यामुळं यातील अनेक सुतगिरण्यांना लिलावाच्या कटु प्रक्रियेला सामोऱं जाणं भाग पडलं आहे.

या प्रतिकुल परिस्थितीत राज्य शासनानं सहकारी व खाजगी सुत गिरण्यांच्या सवलतीत भेदभाव केल्यामुळं खासगी सुतगिरण्या अडचणीत आल्या आहेत. सन २०११ ला राज्य शासनानं कापसाच्या हिंसक तेजी मंदीच्या नुकसाणीपोटी फक्त सहकारी गिरण्यांना त्या कालातील सुत उत्पादनास प्रती किलो २०/- रु प्रमाणं करोडो रुपयांचं अनुदान दिलं होतं. २०१७-१८ ला प्रति स्पिंडलला तीन हजार रुपयांचं साॅफ्ट लोन अर्थात व्याजमुक्त कर्ज दिलं, २०१८ च्या वस्त्रोद्योग धोरणात सहकारी गिरण्यांना १ रु जादा वीजदर सवलत दिली व आता पुन्हा फक्त सहकारी गिरण्यांना गेल्या दोन वर्षातील कापुस खरेदीच्या १० टक्के कापुस अनुदान देण्यासाठी कार्यवाही सुरु केली आहे.

सवलतीतील या भेदभावामुळं सहकारी व खाजगी सुत गिरण्यांच्या उत्पादन खर्चामध्ये जवळपास २५ रु प्रती किलोला फरक पडत असुन या असमान पातळीवरच्या स्पर्धेमुळं खाजगी सुत गिरण्या नुकसाणीमुळं बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळं आता खासगी सुतगिरणी संघटनेच्या माध्यमातून या प्रश्नावर शासन दरबारी आवाज उठवणार आहोत. लवकरच सहकारी आणि खासगी हा भेदभाव दूर करण्यात आम्हाला यश येईल असौ मत आमदार संजय शिंदे यांनी व्यक्त केले.

अजितदादा पवार यांच्या सोबत बैठक…

आम. संजयमामा शिंदे यांनी खासगी सुतगिरण्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी लवकरच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेसोबत एका व्यापक बैठकीचं आयोजन  करु असं सांगितलौ आहे. आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील खासगी सुतगिरणी चालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी प्रयत्नशील राहणार आहोत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा