राज्यात ३५ हजार कोटींची गुंतवणूक, २३ हजार नोकऱ्या, १ लाख कोटी गुंतवणुकीचे उद्दिष्ट

10

मुंबई, ३ नोव्हेंबर २०२०: महाराष्ट्रातील युवकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकार १५ मोठ्या कंपन्यांसोबत करार करणार आहे. या पंधरा कंपन्यांसोबत केलेल्या करारातून महाराष्ट्रात तब्बल ३५ हजार कोटींची गुंतवणूक येणार आहे. या ३५,००० कोटींच्या गुंतवणूक मधून २३,१८२ नोकऱ्या राज्यातील तरुणांना मिळणार आहेत. एकंदरीत राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहे.

कोरोनाव्हायरस च्या संकटामुळं अनेकांचे रोजगार गेले, तर उद्योगधंद्यांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल. एकूणच राज्याच्या आर्थिक उलाढालीवर याचा मोठा परिणाम झाला होता. यातून सावरण्यासाठी राज्य सरकार सातत्यानं प्रयत्न करत होतं. यासंदर्भात राज्य सरकारनं आज एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज एमआयडीसी आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या.

या करारानुसार १५ कंपन्यांमार्फत राज्यात जवळपास ३४,८५० कोटींची गुंतवणूक होणार आहे. तसंच यामुळं सुमारे २३,१८२ लोकांना रोजगार उपलब्ध होणार असून राज्य सरकारनं आता आगामी काळात राज्यात १ लाख कोटींच्या गुंतवणुकीचं उद्दिष्टं ठेवलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित राज्यातील गुंतवणुकीच्या करारावर सह्या करण्यात आल्या. त्यावेळी त्यांनी समाधान व्यक्त केलं.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, कोणतीही गुंतवणूक करताना विश्वास महत्त्वाचा आहे. गुंतवणूकदार आणि राज्य शासन या दोघांचा एकमेकांवर विश्वास आहे. मागील सामंजस्य करारातील ६० टक्के उद्योगांच्या बाबतीत सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे, ही निश्चितच समाधानाची बाब आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. मला उद्योग खात्याचा अभिमान आहे, असं सांगतानाच आजची गुंतवणूक ही फक्त सुरुवात आहे. अजून १ लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक राज्यात आणण्याचे उद्दिष्ट आहे, असंही त्यांनी सांगितलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे