काबुल, ३ नोव्हेंबर २०२०: सोमवारी अफगाणिस्तानात काबुल विद्यापीठात बंदूकधारी हल्लेखोर आणि सुरक्षा दल यांच्यात बराच काळ चकमक सुरू होती. प्राथमिक माहितीनुसार, या चकमकीत २५ जण ठार झाले, तर बरेचजण जखमी असल्याचं सांगण्यात आलं. वास्तविक विद्यापीठात पुस्तक मेळावा लावण्यात आला होता. यावेळी इराणी राजदूतही तिथं पोहचले होते. ही घटना झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून या घटनेची निंदा केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केलं की, ‘काबूल विद्यापीठावरील भयानक दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. मृतक आणि जखमींच्या नातेवाईकांबद्दल आम्ही संवेदना व्यक्त करतो. दहशतवादाविरूद्ध अफगाणिस्तानच्या धैर्यशील संघर्षाला आम्ही समर्थन देत राहू.
गृह मंत्रालयाचे प्रवक्ते तारिक अरियन यांनी या हल्ल्यात किती बळी गेले हे स्पष्ट उत्तर दिलं नाही. तथापि, स्थानिक माध्यमांनुसार, २० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
गृह मंत्रालयाचे प्रवक्ते एरियन यांच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यात तीन हल्लेखोरांचा सहभाग होता. चकमकीदरम्यान सुरक्षा दलानं हे तीन हल्लेखोर ठार केले आहेत. नंतर तालिबान्यांनीही या हल्ल्याबाबत निवेदन जारी केलं. या हल्ल्यात आपली कोणतीही भूमिका नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
हा हल्ला अशा वेळी झाला आहे जेव्हा विद्रोहींच्या पाठिंब्यानं अमेरिकन सरकारशी शांतता चर्चा सुरू आहेत. तथापि, कतारमधील या संवादाचं उद्दीष्ट म्हणजे अमेरिकेला त्याच्या प्रदीर्घ लढाईतून बाहेर पडायला मदत करणं. परंतु दररोज असे रक्तरंजित हल्ले सुरू आहे. इस्लामिक स्टेटशी संबंधित एका संघटनेनं देशात शियांवर हल्ले करण्यास सुरवात केली आहे. पाच तासाच्या चकमकीदरम्यान विद्यापीठाच्या आजूबाजूच्या रस्त्यावर तुरळक ग्रेनेड स्फोट आणि स्वयंचलित शास्त्रामधून गोळीबार होत असल्याचे आवाज ऐकू येत होते. दुसरीकडं अफगाण सुरक्षा दलानेही मोर्चा कायम ठेवला. आपले प्राण वाचवण्यासाठी विद्यार्थी पळताना दिसले.
विद्यापीठात शिकत असलेल्या अहमद शमीम या विद्यार्थ्यानं घडलेल्या घटनेचं वर्णन करताना असं म्हटलं की, त्याला पिस्तुल आणि रायफल घेऊन विद्यापीठाच्या काही भागांमध्ये हल्लेखोर गोळ्या झाडताना दिसले. या विद्यार्थ्याच्या म्हणण्यानुसार विद्यापीठाच्या पूर्व भागात हा आतंकवादी हल्ला झाला. विद्यापीठाच्या या पुर्वभागात कायदेविषयक शिक्षण तसेच पत्रकारिता याबाबत प्रशिक्षण दिलं जातं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे