मुंबई, ३ नोव्हेंबर २०२०: मोस्ट वाँटेड दाऊद इब्राहिम याच्या वडिलोपार्जित संपत्तीचा लिलाव होणार आहे. हा लिलाव १० नोव्हेंबर रोजी होणार आहे. हा लिलाव सफेमा म्हणजेच स्मगलिंग फॉरेन एक्सचेंज मॅनिपुलेटर अॅक्ट अंतर्गत होणार आहे. खेड तालुक्यातील मुंबके हे दाऊदचं मुळ गाव असून या गावातील दाऊदच्या बंगल्यासोबत सात मालमत्तेचा लिलाव होणार आहे. दाऊदची संपत्ती खरेदी करण्यासाठी अनेकांनी उत्सूकता दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
तस्कर आणि विदेशी चलनाशी संबंधित गैरव्यवहार करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी सरकारने सफेमा हा कायदा केला. हा कायदा १९७६ मध्ये करण्यात आला. ‘सफेमा’नुसार तस्कर, विदेशी चलनाशी संबंधित गैरव्यवहार करणारे, हवाला रॅकेट चालवणारे अशांची संपत्ती जप्त करुन त्या संपत्तीचा वापर अथवा लिलाव करण्याचे अधिकार सरकारला मिळाले आहेत. कायद्यातील तरतुदीनुसार दाऊद आणि त्याच्या फरार नातलगांच्या नावावर असलेली संपत्ती सरकारने जप्त केली आहे. यात कोकणातील वडिलोपार्जित संपत्तीचाही समावेश आहे. या संपत्तीचा लिलाव करण्याचा निर्णय झाला आहे. जाहीर लिलाव १० नोव्हेंबर रोजी होणार आहे.
स्मगलिंग फॉरेन एक्सचेंज मॅनिपुलेटरच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी काल दाऊदच्या मालमत्तेची पाहणी केली. या मालमत्तेची विक्री करण्यासाठी वित्त मंत्रालयाने दाऊदच्या मालमत्ता ताब्यात घेतल्या आहेत. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष जागेवर लिलाव होणार नाहीत. १० नोव्हेंबर रोजी सर्व मालमत्तांचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लिलाव केले जाणार आहेत.
दाऊद आणि त्याच्या फरार नातलगांच्या नावावर कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मोठी संपत्ती आहे. या वडिलोपार्जित संपत्तीपैकी सात मालमत्ता दाऊदच्या नावावर आहेत तर १० मालमत्ता त्याच्या फरार नातलगांच्या नावावर आहेत. खेडमध्ये असणारा तीन मजली अलिशान बंगला हा दाऊदच्या बहिणीच्या नावे आहे. तर इतर मालमत्ता त्याची आई अमिना बी च्या नावे आहेत. सरकारनं जप्त केलेल्या या १७ मालमत्तांसाठी १० नोव्हेंबर रोजी लिलाव होणार आहे. लिलावासाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज दाखल करुन घेतले जात आहेत. ही प्रक्रिया ६ नोव्हेंबर पर्यंत ऑनलाइन पद्धतीने सुरू असेल. डिजिटल पद्धतीने लिलाव करुन संपत्तीची विक्री केली जाणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे