माढा, दि.६ नोव्हेंबर २०२०: माढा येथील रेल्वे वर्कशॉप रेल्वे बोर्डाच्या इशाऱ्या नुसार बंद करण्याच्या हालचाली चालू हाेत्या . परंतु मी योग्य वेळीच हस्तक्षेप करून ६० कोटी रुपये मंजूर केले यामुळे ५११ कामगारांची भरती होऊ शकणार असल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कुर्डुवाडी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली .
खासदार निंबाळकर यांनी कुर्डूवाडी रेल्वे वर्कशाॅपला भेट देऊन येथील कामाची पाहणी करून माहिती दिली की चिंकहील येथे आर पी एफ ट्रेनिंग सेंटर बंद झालेले आहे तेथे पुन्हा सुरू करणे अशक्य आहे . यामुळे आपल्या हातात आता कुर्डुवाडी येथील रेल्वे वर्कशॉप सुस्थीतीत चालवणे गरजेचे आहे . हे ही वर्कशॉप बंद करायचे नियोजन रेल्वे बोर्डाचे चालू हाेते . परंतु मी रेल्वेतील विविध कमिटीवर काम करत असल्यामुळे मला याची माहिती मिळाली त्यामुळे वेळीच हस्तक्षेप करून रेल्वे प्रशासनाचा हा निर्णय मि हाणून पाडला व वरून ६० कोटी रुपये या रेल्वे वर्कशॉपच्या विस्तारीकरणासाठी मंजूर केले आहेत .
वाढीव मंजूर केलेल्या निधीमुळे भविष्यात या ठिकाणी ५११ कामगारांची भरती होणार आहे . या कामगार भरती मध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे यासाठी मी प्रयत्न करणाार आहे . रेल्वेच्या माल वाहतूक वॅगन दुरुस्तीच्या या प्रकल्पासाठी भविष्यात आणखीन वाढीव निधी मंजूर करून घेणार आहे . यामुळे भविष्यात एक हजार कामगार व जुने ३०० कामगार असे पूर्वीचे रेल्वे वर्कशॉपचे गतवैभव मी माझ्या काळात आणणार आहे . यासोबतच रेल्वेचे इतर प्रकल्प कुर्डूवाडीत राबवता येतात काय याविषयी सुद्धा चाचपणी करण्यात येते आहे . यासाठी चिंकहिल येथे सव्वाशे एकर जमीन उपलब्ध आहे .
यासोबतच मोडनिंब येथील प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याची मागणी पूर्ण केली आहे . व येथे शेतकऱ्यांचा कृषिमाल रेल्वेमध्ये चढवण्यासाठी मालवाहू धक्का तयार करण्यात येणार आहे . किसान रेल्वेला माेडनिंब येथेही थांबा देण्यात येणार आहे . जेऊर ते पुणे असा रेल्वेचा सलग पास नियमामुळे मिळत नव्हता परंतु जनरल मॅनेजर यांच्या अधिकारात ताे पास देण्यास भाग पाडले आहे . यामुळे करमाळा तालुक्यातील प्रवाशांची सोय होणार आहे . कुर्डूवाडी रेल्वे स्थानकावर काही गाड्यांना प्रवाशांच्या मागणी नुसार थांबा ही देण्यात येणार आहे व विजापुर मुंबई हि गाडी आठवडाभर धावण्यासाठी प्रयत्न करु असे ते म्हणाले .
भविष्यात येथे रेल्वेच्या कामगारांची संख्या वाढणार आहे यामुळे कुर्डूवाडी येथील रेल्वेचे हायस्कूल बंद पडलेली आहे त्या ठिकाणी सीबीएससी पॅटर्नचे केंद्रीय विद्यालय सुरू करण्याचा मानस माझा असल्याचा ते म्हणाले . कुर्डूवाडी येथील रेल्वेचा कुठलाही कर्मचाऱ्याचा विभाग बंद पडू न देता तो इतरत्रही हलवू न देन्याचा ठाम आत्मविश्वास खासदार निंबाळकर यांनी याप्रसंगी बोलून दाखवला . यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख माढा तालुकाध्यक्ष योगेश बोबडे करमाळ्याचे गणेश चिवटे गोविंदराव कुलकर्णी सुहास शहा अजित परबत तात्यासाहेब गाेडगे उमेश पाटील जयसिंग ढवळे रेल्वेचे वर्कशाॅप मॅनेजर संजय साळवे वाहीद शेख महेंद्र जगताप याेगेश पाटील हरी भराटे व कार्यकर्ते उपस्थित होते .
कुर्डूवाडीतील प्रश्नी प्रशासनाची घेतली झाडा झडती
गेली वीस वर्षे झाले कुर्डूवाडी शहरात ९१७ मालमत्ता धारकांचा प्रश्न रेंगाळत पडलेला आहे . गावठाणातील बहुतांश जागेवर महाराष्ट्र शासनाचे नाव आहे हे नाव कमी करण्याची मागणी अनेक वर्ष होत आहे . तसेच कुर्डुवाडी येथे शासनाचे ट्रामा केअर सेंटर मंजूर आहे परंतु काम अद्याप हाेत नाही हा प्रश्न खासदार निंबाळकर यांना सांगितला असता त्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांची या प्रश्नी झाडा झडती घेऊन काम करण्याची मागणी केली .
न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रदीप पाटील