मोजाम्बिक, ११ नोव्हेंबर २०२०: दक्षिण आफ्रिकेचा देश मोजाम्बिकमध्ये एक भयानक दृश्य पाहायला मिळालं आहे. इस्लामिक स्टेट (इसिस) च्या दहशतवाद्यांनी एका गावातील ५० लोकांचं शिरच्छेद केलं. खेड्यातल्या एका फुटबॉल मैदानात ही निर्घृण हत्या करण्यात आली. इतकंच नाही तर मेलेल्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून त्यांना जंगलात फेकण्यात आलं. गावातील महिलांचं अपहरण करण्यात आलं.
मोझांबिकच्या काबो डेलगाडो राज्यातील नानजाबा गावात ही भीषण घटना घडली. हे राज्य नैसर्गिक वायूसाठी प्रसिद्ध आहे. २०१७ पासून आतापर्यंत तीन वर्षांत या भागात इस्लामिक दहशतवाद्यांनी २००० लोकांना ठार केलं आहे. या दहशतवाद्यांच्या भीतीमुळं सुमारे ४.३० लाख लोक राज्य सोडून वेगवेगळ्या ठिकाणी गेले आहेत.
५० जणांचे शिरच्छेद करून, त्यांचे मृतदेह छीन्न विछीन्न करून आणि महिलांचं अपहरण केल्यानंतर दहशतवाद्यांच्या आणखी एका गटानं या गावाला पेटवून दिलं. गावातील अनेक घरे जळून खाक झाली आहेत. बीबीसी आणि डेलीमेलच्या वृत्तानुसार दहशतवादी गावात घोषणाबाजी करत आले. घरं जाळण्यास सुरुवात केली. लोक घराबाहेर पडताच त्यांना पकडून नेण्यात आलं आणि त्यांचा शिरच्छेद केला.
इतकंच नव्हे तर एका आठवड्यापूर्वीही या दहशतवाद्यांनी अनेक गावे हल्ला करून उद्ध्वस्त केली. मुएडा जिल्ह्यातील एका सरकारी अधिकाऱ्यानं सांगितलं की, जंगलातील काही विकृत मृतदेह पाहिल्यावर पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. ५०० मीटरच्या परिघात, जवळपास २० मृतदेह लोकांना आढळले.
या घटनेपूर्वी मार्च आणि एप्रिल महिन्यातही अशीच एक घटना घडली होती. त्यावेळी देखील ५० लोकांचे शिरच्छेद करण्यात आले होते. इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी एक्सॉन मोबिल आणि टोटल गॅस प्रोजेक्टजवळ या घटना घडवून आणल्या. या उर्जा विकास प्रकल्पांच्या आगमनानंतर गेल्या काही महिन्यांत या भागात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे