औरंगाबाद, १९ नोव्हेंबर २०२०: गंगापूर साखर कारखान्यातील निधीची अफरातफर केल्याप्रकरणी भाजप आमदार प्रशांत बंब यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत बंब हे गंगापूर साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. आमदार प्रशांत बंब यांच्यासह आणखी सोळा जणांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार करण्यात आली आहे.
प्रशांत बंब यांनी बनावट कागदपत्रं तयार करून सभासदांची फसवणूक करत १५ कोटी ७५ लाखांचा अपहार झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यानंतर कारखान्यातील सभासदांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला गेला. पोलिसांनी याची नोंद घेत प्रकरणाचा शोध सुरू केला असल्याची माहिती आहे.
गंगापूर सहकारी साखर कारखान्याची विक्री होऊ नये, यासाठी सभासदांनी जमा केलेली रक्कम, कारखान्याच्या खात्यावर परत आली. मात्र, कारखान्याचे अध्यक्ष आमदार प्रशांत बंब आणि संचालकांनी खात्यावरील १५ कोटी ७० लाख रुपये कारखान्याशी संबंध नसलेल्या सहा व्यक्तींच्या नावावर वर्ग केली आहे, अशी तक्रार माजी अध्यक्ष कृष्णा पाटील डोणगावकर यांनी शिल्लेगाव (ता. गंगापूर) पोलिस ठाण्यात दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे