पुणे, २६ नोव्हेंबर २०२०: ‘देणे समाजाचे समाजासाठी’ या उपक्रमांतर्गत गेल्या १२ वर्षापासुन ‘अंकुर प्रतिष्ठान’ नागरिकांना आवाहन करुन आपल्याकडच्या जुन्या वापरण्यायोग्य वस्तू आमच्या संस्थेला द्या, त्या वस्तू सामाजिक संस्थांना मोफत देऊन त्यांची गरज आम्ही भागवू असा स्तुत्य उपक्रम राबविते. कर्वेनगर येथे या उपक्रमाला महापौर मुरलीधर मोहोळ हे उपस्थित राहून त्यांनी जमा झालेल्या साहित्यांचे वाटप सामाजिक संस्थाना केले. कोरोनाच्या काळातही सातत्याने उपक्रम चालू ठेवत, सामाजिक संस्थांना मदतीचा हात दिला, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले.
याप्रसंगी कर्वेनगर रा. स्व. संघाचे संघचालक श्री उल्हासजी जोशी, स्विकृत नगरसेविका अॅड सौ. मीताली साळवेकर, संस्थेचे अध्यक्ष श्री कुलदीप साळवेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमात सुमारे तीन लाखाहून अधिक विविध प्रकारच्या ज्यात फ्रिज, वॉशिंग मशीन, कॉम्पुटर, लॅपटॉप, म्युझिक सिस्टिम,भांडी, काचेची भांडी, खेळणी, पुस्तके, फर्निचर, कपडे अशा वस्तू जमा झाल्या होत्या.
या सर्व वस्तूंची खोपोली येथील सर्वोदय, मुळशी येथील आदिवासी भागात काम करणारी डोनेट-एड, शिरूर जवळील सेवादीप, बीड येथील Hiv मुलांमध्ये काम करणारी इंफॅन्ट इंडिया तसेच बार्शी, सोलापूर, हेमलकसा, शिवणे, पुण्यातील गुरुवार पेठ येथील संस्थांना ही मदत म्हणून वस्तूंचे वाटप केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी :- ज्ञानेश्वरी आयवळे