पुणे: विधानसभेची निवडणूक होऊन तीन आठवडे उलटल्यानंतरही अजूनही सरकार स्थापन झालेले नाही. सत्तास्थापनेसाठी व सत्ता लोभापायी राजकारण्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी शेतकरी व सामान्य माणसाला काडी मोलाचे मोल दिले आहे. सत्तेच्या लोभापाई यांना राज्यात शेतकऱ्यांवर आलेले संकट व सामान्य जनांची खोळंबून पडलेली कामे नजरेआड झाली आहेत.
गेल्या दोन दिवसात तीन पक्षांना राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले. प्रत्यक्षात सरकार स्थापनेच्या दिशेने अजूनही वाटचाल सुरू झालेली नाही. अतिवृष्टी ने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा मोठा प्रश्न महाराष्ट्रात समोर उभा असताना सत्तेसाठी सुरू असलेला गोंधळ मतदारांना चीड आणणारा आहे.
सरकार कोणाचेही येऊद्या परंतु महाराष्ट्रातील शेतकरी, बेरोजगारी या प्रश्नांकडे लक्ष द्या या भावना सामान्य जनांमधून व्यक्त केल्या जात आहे. सत्तेच्या लोभाची पट्टी डोळ्यांवर बांधलेल्या या राजकारण्यांना महाराष्ट्रातील या प्रश्नांचा जणू विसरच पडला आहे. शेतकऱ्यांचा खरा नेता कोण हे दाखवण्यासाठी काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना भेटण्यासाठी सर्व नेत्यांमध्ये चढाओढ सुरू होती आणि आता सत्तेचा प्रश्न आल्यावर मंत्रीपद कोणाकडे येईल यासाठी सर्वांची चढाओढ चालू आहे तेही सामान्यजनांच्या डोक्यावर पाय देऊन.