बारामती, १४ डिसेंबर २०२०: महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी बारामती पंचायत समितीसमोर गुरूवार (दि. १०) पासून अमरण उपोषणास सुरूवात केली आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी कर्मचाऱ्यांनी अर्धनग्न होत मुंडण करून शासनाचा निषेध केला.
कोरोना संक्रमणाच्या काळात ज्यांनी आपला जीव धोक्यात घालून गावातुन कोरोनाला हद्दपार करण्याची मोहीम सुरु केली, रुग्णांच्या जवळ जाण्यासही ज्या ठिकाणी घरातील माणसं ही धजावत नव्हती, अशावेळी मात्र राज्यभरातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी अगदी गावातील स्वच्छता करणं, सॅनिटायझर मारणं, बॅरिगेट लावणं यापासून ते रुग्णाला अॅम्बुलन्स मध्ये बसविणं, अगदी रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर अंत्यविधी करण्याचं ही काम केलं. मात्र, त्याच कर्मचाऱ्यांना आज वेगवेगळ्या कारणास्तव कामावरून काढून टाकणं, पगार न देणं, बोनस न देणं अशा समस्यांना सामोरं जावं लागत आहे.
या विरोधात बारामतीतील महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीनं बारामती पंचायत समिती समोर अर्धनग्न होऊन, मुंडण करुन प्रशासनाचा निषेध नोंदवत आंदोलन सुरू केलं आहे. बारामती तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या महिला सफाई कामगाराला तीन महिने पगार मिळाला नाही, बोनस मिळाला नाही. याविषयी पगाराची मागणी संबंधित महिलेनं केली असता, तुम्ही बिडीओंच्या घरी दिवाळी खायला जा असं उपरोधिक उत्तर देण्यात आलं. काही कामगारांना वय जास्त झालं या कारणास्तव कामावरुन काढून टाकण्यात आलं.
त्यामुळं त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र, याविषयी मागील दहा महिन्यांपासून पत्रव्यवहार सुरु आहे. तरीही पंचायत समितीसह वरिष्ठ अधिकारी याकडं गांभीर्यानं पाहत नसल्याचं चित्र आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव