माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी कर्णधार विराट कोहली याला दिला सल्ला…

नवी दिल्ली, १६ डिसेंबर २०२०: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात १७ डिसेंबरपासून ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरू होत आहे. या मालिकेपूर्वी अनेक क्रिकेट पंडित आपापले विचार मांडत आहेत. अशातच भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी विराटला सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटलं की, भारतानं कसोटी सामन्यात २ फिरकीपटूंसह पाच गोलंदाज खेळवावेत.

भारतानं आपल्या संघात कोणत्या खेळाडूंना संधी द्यावी?, याबद्दल बोलताना अझरुद्दीन यांनी फिरकीपटूंना संधी द्यावी, अशी मागणी केली. त्यांच्या मते, “भारतीय संघानं ५ गोलंदाजांसह उतरावं. गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्यात फिरकीपटूंना मदत मिळते. पण, विराट दोन फिरकीपटूंना संधी देईल का?, अशी मला शंका आहे. सामना जिंकण्यासाठी नेहमी पाच सर्वोत्तम गोलंदाजांना संधी देण्यात यावी, कारण संघाला सामना गोलंदाजच जिंकून देऊ शकतात.”

अझरुद्दीन यांच्या मते भारतातील परिस्थिती व ऑस्ट्रेलियन परिस्थितीत बराच फरक असतो. भारतात फिरकीपटूंसाठी मदत असते. फलंदाजीबद्दल बोलताना अझरुद्दीन म्हणाले, “जर तुमचे टॉप ५ फलंदाज धावा करू शकत नसतील, तर तुम्ही सहाव्या फलंदाजाकडून धावांची अपेक्षा ठेवू शकत नाही. भारतानं ५ गोलंदाज खेळवावेत.”

फलंदाजीबद्दल बोलताना अझरुद्दीन म्हणाले, “भारतीय फलंदाजी उत्तम आहे. भारताला जिंकण्यासाठी प्रथम फलंदाजी करणं गरजेचं आहे व त्यात त्यांनी चांगल्या धावा बनवणं आवश्यक आहे.” अझरुद्दीन यांनी हार्दिक पंड्याचा समावेश कसोटी संघात करावा अशी मागणीही केली.

ते म्हणाले, “हार्दिक हा उत्तम अष्टपैलू आहे व तो संघाच्या गरजेनुसार फलंदाजी करू शकतो. हार्दिकने यापूर्वी देखील संघासाठी उत्तम धावा बनवल्या आहेत.”

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा