कोलकाता, १८ डिसेंबर २०२०: पुढील वर्षीच्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बंगालच्या ममता बॅनर्जींचा ताण वाढवण्यासाठी तयारी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जनता दल युनायटेडने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पक्ष ७५ जागांवर आपले उमेदवार उभे करण्याची तयारी करत आहे. जनता दल युनायटेडचे बंगालचे प्रभारी गुलाम रसूल बलियावी यांनी याबाबत खुलासा केला.
गुलाम रसूल बलियावी म्हणाले की, त्यांचा पक्ष पश्चिम बंगालमध्ये गेली ३ वर्षे कार्यरत आहे आणि आता निवडणुका येताच पक्षाने अशा ७५ जागा निवडल्या आहेत जिथे पक्षाने उमेदवार उभे केले तर त्यांना यश मिळू शकेल. ते म्हणाले, “बंगालमध्ये निवडणुकीची वेळ आली असून पक्षाने ७५ जागा निश्चित केल्या आहेत जिथे उमेदवार उभे करण्याची तयारी आहे. गरज भासल्यास आम्ही आणखी उमेदवार उभे करू. बंगालमध्ये निवडणुका लढविण्याचा अंतिम निर्णय नितीशकुमार घेतील, पण बंगालमध्ये आमच्या पक्षाच्या युनिटने ७५ जागा लढवण्याचा विचार केला आहे. ”
बलियावी पुढे म्हणाले, “जनता दल संयुक्त उमेदवार उभे करण्याची तयारी करत असलेल्या भागात सिलीगुडी, मुर्शिदाबाद, मालदा, दिनाजपूर, बांकुरा, मेदनीपूर, २४ परगणा आणि नंदीग्राम यांचा समावेश आहे. बंगाल निवडणुकीत पक्ष दारू बंदी हा मुख्य मुद्दा बनवणार आहे आणि दारू बंदीचा बिहारमध्ये कसा फायदा झाला आहे आणि हा मुद्दा बंगालमध्येही राबविला जावा याबद्दल लोकांमध्ये हाच प्रश्न घेणार आहे.”
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे