पुरंदर, २२ डिसेंबर २०२०: पुरंदर तालुक्यातील महिलांमध्ये आरोग्यविषयक समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे व बहुतांश महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याचे तालुक्यात झालेल्या विविध रक्तदान शिबिरांमधून पुढे आले आहे. त्यामूळे तालुक्यात महिलांच्या आरोग्याबाबत दक्षता घेणे गरजेचे असल्याचे अक्षय ब्लड बँकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश कांबळे यांनी म्हटले आहे.
पुरंदर तालुक्यात पद्मविभूषण खा. शरद पवारांच्या वाढ दिवसा निमामित्त तालुक्यातील विविध गावातून रक्तदान शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांत रक्तदान करण्यासाठी महिलांनी सुद्धा मोठा सहभाग नोंदवला होता. मात्र, या शिबिरात आलेल्या १०० पैकी केवळ चार ते पाच महिलाच रक्तदान करू शकल्या आहेत. यामध्ये महिलांचे वजन प्रमाणापेक्षा कमी किंवा हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याने अनेक महिला रक्तदान करू शकल्या नाहीत.
या महिन्यात तालुक्यातील सासवड, जेजुरी, वाल्हे, परींचे येथे राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांच्यावतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. नीरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस व साई सेवा प्रतिष्ठानच्यावतीने दोन वेगवेगळी रक्तदान शिबिरे घेण्यात आली हो ती. त्याच बरोबर भिवरी येथे येवले फाउंडेशनच्यावतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. या सर्वच शिबिरांमध्ये बहुतांश महिलांना रक्तदान करता आले नाही. अनेक महिलांनी रक्तदान देण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतला होता. मात्र हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणे किंवा वजन कमी असणे या कारणामुळे त्यांना रक्तदान करता आले नाही.
डॉ. रमेश कांबळे( वैद्यकीय अधिकारी, अक्षय ब्लड बँक,पुणे)
” रक्तामध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असणे हे रक्तदानासाठी आलेल्या बहुतांश महिलांमध्ये आढळून आले आहे. आरोग्यासाठी ते घातक असून याकडे महिलांनी. तसेच घरातील कर्त्या लोकांनी लक्ष देणे गरजेचे आहे.”
भैय्यासाहेब खाटपे (सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक)
“आम्ही नीरा येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर मध्ये ३० महिला रक्तदानासाठी आल्या होत्या मात्र या महिलांमध्ये हिमोग्लोबिन प्रमाण कमी असल्याने त्या रक्तदान करू शकल्या नाहीत.तालुक्यात झालेल्या सर्वच रक्तदान शिबिरात हे अधळून आले आहे.त्यामूळे पुढील काळात महिलांचे आरोग्य सुधारावे यासाठी प्रयत्न करणार आहोत. लवकरच गावो गाव महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यासाठी तसेच ते सुधारण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करणार आहोत.कुठुंबतील महिला निरोगी असणे फार महत्त्वाचे आहे.”
उज्वला जाधव ( तालुका वैद्यकीय अधिकारी)
ॲनिमिया निर्मूलनासाठी सरकारकडून ‘ॲनिमिया मुक्त भारत’ ही योजना राबवली जात आहे. या माध्यमातून त्रिस्तरिय उपाय योजना केल्या जात आहेत. गावातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, मेडिकल ऑफिसर हे सर्वच यासाठी काम करतात. मात्र याला महिलांचा प्रतिसाद मिळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सध्या प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या चुकीच्या माहिती आधारे किंवा चुकीच्या संकल्पनांमुळे महिला आपल्या आहाराकडे लक्ष देत नाहीत किंवा पोषक आहार घेत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारच्या समस्या निर्माण होतात. आरोग्य विभागाकडून याबाबत उपाययोजना केल्या जात आहेत. महिलांनी स्वतःहून पुढे येऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात याबाबतची तपासणी करून उपचार घ्यावेत. जंक फूड खाण्यापेक्षा घरातील पौष्टिक अन्नपदार्थांचे सेवन केलं तर आपण ॲनिमिया लवकर बरा होऊ शकतो. तालुक्यात याबाबत सर्वे करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे