बारामती, १० जानेवारी २०२१: कोरोना संसर्गाच्या बाबतीत बारामतीतील नागरिक हलगर्जीपणे वागत आहेत. सध्या रोज २० ते २५ कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. रोज २०० लोक कोरोना संसर्गाची चाचणी करत आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी नागरिक सोशल डिस्टन्स, मास्क व सॅनिटायजर वापर करत नसल्याने नागरिकांनी याची दखल घ्यावी अन्यथा परत कोरोनाच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल, असा इशारा तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिला.
जागतिक स्तरावर कोरोना संसर्ग धुमाकुळ घालत आहे. मात्र बारामती शहरात कोरोना संसर्गाच्या बाबतीत नागरिक हलगर्जीपणे वागतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. बारामती तालुक्यात शासकीय व खाजगी हॉस्पिटलमध्ये २०४ रुग्ण उपचार घेत असुन आज पर्यंत १४० रुग्ण दगावले असून नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. सध्या सुरू असणाऱ्या लगीन सराई, ग्रामपंचायत निवडणुक, बाजारपेठेत मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तर नागरीक सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायजरच्या बाबतीत कोरोना संसर्ग गेला की काय असे वागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
यावर नागरिकांनी दक्षता घेतली नाहीतर पुन्हा कोरोना संसर्गाचा उद्रेक होईल. शासकीय व खाजगी मध्ये रोज २००नागरिक कोविड चाचणी करत आहेत. काही नागरिक कोरोना संसर्गाची लक्षणे असताना खाजगी हॉस्पिटलमध्ये इलाज घेत घरीच राहत असल्याने कुटुंब कोरोना बाधित असल्याचे अनेक ठिकाणी निदर्शनात आले आहे. १ डिसेंबर पासून ९ जानेवारीपर्यंत ४४३ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.कोरोना बाधित रुग्णांनी व त्याच्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी १४ दिवस क्वारंटाईन राहणे गरजेचे आहे. तरच ही कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल असे डॉ खोमणे यांनी सांगितले.
बारामती शासकीय रुग्णालयात ६३ रुग्ण व आय सी यु मध्ये ४ रुग्ण इलाज घेत आहेत. शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्णांची संख्या तेवढीच असून दौंड, इंदापुर, कर्जत, माळशिरस, जामखेड, फलटण या शेजारच्या तालुक्यातून बारामती मध्ये इलाजासाठी येत आहेत. तर सोशल डिस्टन्स, सॅनिटायजर, मास्क याविषयी नागरिकांनी पालन करावे तर हलगर्जी नागरिकांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी तर ज्यांना सर्दी, ताप, खोकला असेल त्यांनी खाजगी दवाखण्यात वेळ न घालवता शासकीय रुग्णालयात रोज सकाळी १० ते १ यावेळेत कोविडची तपासणी करुन त्यांना योग्य इलाज केला जाईल असे वैद्यकीय अधीक्षक डॉ सदानंद काळे यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव