नवी दिल्ली, २६ जानेवारी २०२१: सोमवारी डीआरडीओने आकाश क्षेपणास्त्राच्या नवीन आवृत्तीची यशस्वी चाचणी केली. ओडिशामधील इंटिग्रेटेड टेस्टिंग सेंटर येथून हे क्षेपणास्त्र डागण्यात आले. त्याला आकाश-एनजी अर्थात न्यू जनरेशन (नवीन पिढीचे) आकाश क्षेपणास्त्र असे नाव देण्यात आले आहे. हे जमिनीवरून हवेत मार करण्यात सक्षम आहे. हे भारतीय हवाई दलासाठी खास बनवले गेले आहे. आकाश-एनजी सीमेवरील तणाव आणि वाढत्या हवाई जोखीम लक्षात घेता प्रभावी ठरणार आहे.
सर्व निकषांवर यशस्वी
डीआरडीओने सांगितले की, नवीन आकाश क्षेपणास्त्र लक्ष्य गाठण्यात यशस्वी ठरले आहे. तसेच चाचणी दरम्यान आकाश शेपणास्त्र सर्व निकषांवर खरे उतरले आहे. क्षेपणास्त्राचे कमांड कंट्रोल सिस्टम, एवियोनिक्स, एअरोडायनामिक सिस्टम हे सर्व व्यवस्थित रित्या चालले.
उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी सोमवारी प्रतिपादन दिले, त्यांनी क्षेपणास्त्र तंत्रज्ञानामध्ये आत्मनिर्भरतेसाठी शास्त्रज्ञांचे कौतुक केले. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता साधणे केवळ रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचे नाही, तर राष्ट्रीय अभिमानाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. डॉ. एपीजे अब्दुल कलाम क्षेपणास्त्र संकुलातील दोन केंद्रांचे उद्घाटन केल्यानंतर नायडू यांनी आपल्या भाषणात हे सांगितले. ते म्हणाले की, डीआरडीओच्या क्षेपणास्त्र विभागाचे वैज्ञानिक त्यांचा वारसा सांभाळत आहेत आणि त्यांनी नवीन पिढीची क्षेपणास्त्र यंत्रणा विकसित केली आहे हे जाणून मला फार आनंद झाला.
एका अधिकृत प्रसिद्धीनुसार नायडू यांनी ‘मिसाईल कॉम्प्लेक्स लॅबोरेटरी बाय एक्सपोज़िशन ऑफ टेक्नॉलॉजी’ ला भेट दिली आणि ते म्हणाले की स्वदेशी उत्पादन पाहून आनंद झाला. नायडू म्हणाले की, स्वावलंबी क्षेपणास्त्र तंत्रज्ञान आत्मसात करण्याच्या बाबतीत डीआरडीओच्या शास्त्रज्ञांची जबरदस्त प्रगती पाहून मला पुन्हा एकदा देशाच्या सुरक्षा आणि क्षमतेबद्दल आत्मविश्वास वाटतो.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे