बारामती, ३० जानेवारी २०२१: एमआयडीसीतील एका बंद असलेल्या कंपनीच्या इमारतीमध्ये आर्थिक फायद्यासाठी महिलेकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या दिपक अर्जून नाळे (वय ४५ , रा. डोर्लेवाडी, ता. बारामती) याच्या विरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बनावट ग्राहक पाठवत पोलिसांनी वेश्या व्यवसाय उघड केला.
याप्रकरणी पोलिस कर्मचारी विनोद लोखंडे यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (दि.२९) रोजी ही कारवाई करण्यात आली. सुरू असलेल्या वेश्यावसायाबाबत पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांना माहिती समजली होती. बंद असलेल्या कंपनीमध्ये सुरु असलेल्या अनैतिक व्यापाराची माहिती पोलिस उपअधिक्षकांना दिली. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे यांच्यासह कर्मचाऱ्यांना व पंचांना सोबत घेऊन छाप्याची तयारी केली. बनावट ग्राहक तयार करत त्याच्याकडे दोन हजार रुपये देवून पाठवण्यात आले.
या ठिकाणी छापा टाकला असता नाळे याने नांदल (ता. फलटण) येथील एका महिलेला वेश्या व्यवसायासाठी आणल्याचे लक्षात आले. नाळे याने पैशाचे अमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी आणल्याचे महिलेने पोलिस चौकशीत सांगितले असुन पोलिसांनी घटनास्थळावरून सात हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव