लोणी काळभोर, २ फेब्रुवरी २०२१: पुणे येथील मिल्ट्री कॅन्टीन मधील विदेशी मद्यसाठा गुजरात येथे विकण्यासाठी नेणाऱ्या आरोपीला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अटक केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली, मयुर सतिश उघाडे रा. लोणी काळभोर ता. हवेली जि. पुणे असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
सोमवार दिनांक १ फेब्रुवारी २०२१ रोजी स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पथक कामशेत परीसरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय खबऱ्या मार्फत बातमी मिळाली की, मयुर सतिश उघाडे रा. लाणी काळभोर, ता. हवेली जि. पुणे हा पुणे-अहमदाबाद भाग्यलक्ष्मी ट्रॅव्हल्स नंबर जी.जे. ०३ बीटी २२५७ यामधून त्याचेकडील बॅगामध्ये अवैध विदेशी दारुसाठा विक्रीसाठी गुजरात येथे घेवून जाणार आहे.
त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने कामशेत ता. मावळ जि. पुणे एक्सप्रेस हायवेवर बोगद्याच्या जवळ सदर नंबरची ट्रॅव्हल्स आडवून मयुर उघाडे यास अवैध विदेशी दारूचा साठा एकूण किं. रूपये २४,५०८ यासह ताब्यात घेऊन माल जप्त केला आहे.
सदर जप्त केलेली दारू ही मिलिटरी कॅन्टीन मधून घेतली असल्याचे आढळून आलेले आहे. आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाईसाठी कामशेत पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिला असून पुढील अधिक तपास कामशेत पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरविंद चौधरी हे करीत आहेत.
सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, प्रकाश वाघमारे, सुनील जावळे, महेश गायकवाड, निलेश कदम, गुरू गायकवाड, सुभाष राऊत, अक्षय नवले, प्रसन्न घाडगे यांनी केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे