मुंबई, ४ फेब्रुवरी २०२१: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. आता शाळा देखील सुरू करण्यात आल्या आहेत. महाविद्यालये सुरू करण्याबाबत सातत्याने मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर येत्या १५ फेब्रुवारी पासून राज्यात महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
काय म्हणाले उदय सामंत
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले, “कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. महाविद्यालये सुरु करण्यात यावी अशी मागणी विविध क्षेत्रातून होत होती. याबाबत दि.१ फेब्रुवारी रोजी सर्व कुलगुरुंशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून विद्यापीठातील अभ्यासक्रम, परीक्षेचे नियोजन, वसतिगृह यासंदर्भात मानक कार्यप्रणाली (एसओपी) विद्यापीठांनी तयार करावी. अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या होत्या.”
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दि.५ नोव्हेंबर, २०२० रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जागेची उपलब्धता पाहून, ५० टक्क्यांपर्यंत विद्यार्थ्यांना रोटेशन पद्धतीने वर्गात प्रवेश देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेण्यात आला असल्याचे सामंत यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे