बारामती, ९ फेब्रुवरी २०२१: हाॅटेल चालविण्यासाठी दरमहा २५ हजार रुपयांची खंडणी मागत गल्ल्यातील ७२०० रुपयांची रक्कम जबरीने नेल्याप्रकरणी दोघाजणांविरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन बाळासो तांबे (रा.पाहुणेवाडी, ता. बारामती) व अमीन दिलावर इनामदार (रा.कसबा, बारामती) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत अतुल उद्धव पवार (रा. जगतापमळा, मोरगाव रोड, बारामती) यांनी फिर्याद दाखल केली.
पवार यांनी फलटण रस्त्यावरील संतोष सातव यांचे स्नेहा गार्डन हाॅटेल चालविण्यासाठी घेतले आहे. दि.७ रोजी फिर्यादी हाॅटेलात असताना नितीन तांबे, अमिन इनामदार व अन्य तिघे हाॅटेलात आले. तांबे याने मी एनटी भाई आहे, तु मला अोळखत नाहीस का? माझे पुण्यात भाई लोकांशी संबंध आहेत, तुला हाॅटेल नीट चालवायचे असेल तर दर महिन्याला मला २५ हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली.
माझी एवढी एेपत नाही, थोडी फार रक्कम मी देईन असे फिर्यादी म्हणाले. त्यावर अमिन व इतर तिघांनी एन टी भाईचे लांबपर्यंत संबंध आहेत, तु जर आमच्यावर गुन्हा दाखल केला तर आम्ही जेलमधून तुझा गेम करू, अशी धमकी दिली. तांबे याने हाॅटेलातील व्हीस्कीच्या दोन व रमची एक काॅटर घेतली. इनामदार याने फ्रीजमधील बिअरच्या चार बाटल्या घेतल्या. रात्री उशीरापर्यंत ते दारु पित बसले. निघताना तांबे याने तुला लय माज आला आहे का, मी आत्ताच मोक्का तोडून जेलबाहेर आलो आहे असे म्हणत फिर्य़ादीला मारहाण केली.
खिशातून चाकू बाहेर काढत हप्ता दिला नाही तर तुझे तुकडे पाडू अशी धमकी दिली. इनामदार याने धातूचे कडे पोटात मारले. यावेळी फिर्य़ादीचे भाऊ आकाश, मित्र अमोल जगताप, बबन गवारे यांनी मारू नका, अशी विनवणी केली. तरीही अनोळखी तिघांनी त्यांना धक्काबुक्की, शिविगाळ केली. या प्रकारामुळे हाॅटेलात बसलेले ग्राहक पळून गेले.
त्यानंतर तांबे व इनामदार या दोघांनी गल्ला उघडून त्यातील ७२०० रुपये, हाॅटेलच्या मूळ मालकाकडील हाॅटेलचा परवाना,फिर्यादीच्या हातातील घड्याळ काढून घेतले. उपचारानंतर फिर्य़ादीने यासंबंधी फिर्याद दाखल केली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वाघमारे अधिक तपास करत आहेत.
न्युज अन कट प्रतिनिधी: अमोल यादव