बांगलादेशी नागरिक भाजपा अल्पसंख्याक सेलचा अध्यक्ष, हा तर संघ जिहाद?- काँग्रेस

मुंबई, २० फेब्रुवरी २०२१: कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एक बांगलादेशी नागरिक अटकेबाबत ट्विट केले आहे. हा बांगलादेशी नागरिक उत्तर मुंबईत भाजपच्या अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष पदावर कार्यरत होता. हा नागरिक अवैध कागदपत्रांसह भारतात राहत होता. तपासादरम्यान आरोपी नागरिक उत्तर मुंबईतील भाजपच्या अल्पसंख्याक कक्षाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असल्याचे आढळून आले. रुबेल जोनु शेख असे आरोपीचे नाव असून तो २४ वर्षांचा आहे.

यासंदर्भात कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी एक ट्विट केले असून त्यास भाजपचे संघ जिहाद म्हटले आहे. त्यांनी लिहिले की, ‘काही भाजप नेते गोमाताची तस्करी करताना आढळले, तर काहीजण आयएसआय एजंट म्हणून ओळखले गेले. आता हे रुबेल शेख आहे. अल्पसंख्यक कक्षाचे अध्यक्ष म्हणून भाजपमध्ये कार्यरत असलेला बांगलादेशी नागरिक. भाजपसाठी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात (सीएए) काही वेगळी तरतूद केली गेली आहे का?’

मुंबई पोलिसांनी गेल्या आठवड्यात रुबल शेख याला अटक केली. याबाबत माहिती देताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक भालेराव शेखर म्हणाले की, “आम्ही एका आरोपीला अटक केली आहे. ज्याच्याकडून बनावट कागदपत्रे सापडली आहेत, याच्या आधारे त्याने बनावट आधार कार्ड आणि पॅनकार्डही बनवले. सध्या त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.”

पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, रुबेल शेख हा बांगलादेशातील जसूर जिल्ह्यातील बोव्हलिया गावचा रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुबल शेख २०११ मध्ये कोणत्याही कागदपत्रांविना भारतात दाखल झाला. त्यानी सतत भाजपासाठी काम केले आणि त्यानंतर त्याला भाजपच्या उत्तर मुंबई अल्पसंख्याक कक्षाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले गेले. नंतर बनावट कागदपत्रांच्या आधारे बनविलेले कागदपत्र शेख याला मिळाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा