केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘गो इलेक्ट्रिक’ मोहिमेचा केला प्रारंभ

8

नवी दिल्ली, २० फेब्रुवरी २०२१: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ‘गो इलेक्ट्रिक’ या मोहिमेचा प्रारंभ केला. विजेवर चालणारी वाहने, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग पायाभूत सुविधा आणि स्वयंपाकासाठी विजेवर चालणाऱ्या उपकरणांच्या लाभाबाबत जागृती करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे.

आयातीचे ८ लाख कोटी रुपयांचे बिल असलेल्या जीवाश्म इंधनासाठी इलेक्ट्रिक इंधन हा महत्वाचा पर्याय असल्याचे गडकरी यांनी या देशव्यापी मोहिमेचा प्रारंभ करताना सांगितले. पारंपरिक इंधनाशी तुलना करता इलेक्ट्रिक इंधन हे कमी खर्चिक, कार्बन उत्सर्जन कमी करणारे आणि स्वदेशी आहे. औष्णिक उर्जा प्रकल्पातून सोडल्या जाणाऱ्या कार्बन ऑक्साईडचे मूल्य वर्धन करण्याला प्रोत्साहन देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित असलेले उर्जा मंत्री आर के सिंग यांना केले. भारतात इलेक्ट्रिक वरच्या स्वयंपाकासाठी असलेला वाव आणि संधी यांचाही त्यांनी उल्लेख केला. सार्वजनिक वाहतुकीचे विद्युतीकरण आर्थिक दृष्ट्या किफायतशीर तर आहेच त्याच बरोबर पर्यावरण स्नेहीही आहे असे ते म्हणाले. उर्जा मंत्रालयाने कृषी क्षेत्रातल्या टाकाऊ आणि बायोमास पासून हरित उर्जा निर्मितीला प्रोत्साहन द्यायला हवे, याचा देशातल्या शेतकऱ्यांनाही लाभ होईल असे गडकरी म्हणाले.

गो इलेक्ट्रिक मोहीम, येत्या काही वर्षात देशाचे आयातीवरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी मदत करेल आणि स्वच्छ आणि हरित भविष्यासाठीही हे महत्वाचे पाऊल ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशभरात जागृती निर्माण करण्यासाठी आणि इलेक्ट्रिक वाहन निर्मात्यांचा आत्मविश्वास वृद्धिगत करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

ई मोबिलिटी इको सिस्टीमचा विकास दर्शवणाऱ्या गो इलेक्ट्रिक च्या बोध चिन्हाचेही यावेळी अनावरण करण्यात आले.

उर्जा मंत्रालया अंतर्गत असणाऱ्या एनर्जी इफिशियन्सी ब्युरोकडे या ई मोबिलिटी,सार्वजनिक चार्जिंग यांना प्रोत्साहन देण्यासाठी जागृती मोहीम राबवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे