वादळामुळे राज्यात ६ मृत्यू ९ जण जखमी, एकूण १२ हजार ५०० लोकांचे स्थलांतरण

8
मुंबई, १८ मे २०२१: तोक्ते चक्रीवादळामुळे मुंबई तसेच सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांत निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला तसेच चक्रीवादळाचा प्रवास गुजरातकडे होत असला तरी कोकणातील मुसळधार पाऊस व जोरदार वारे पाहता सावधगिरी बाळगण्याच्या आणि यंत्रणा सज्जच ठेवण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी झाले आहेत. एकूण १२ हजार ५०० जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. किनाऱ्यावरील जिल्ह्यांमध्ये काही नुकसान व पडझड झाली असली तरी कोविड रुग्णालयांना वीजपुरवठा खंडित होऊ देण्यात आलेला नाही त्याचप्रमाणे पुरवठ्याची पर्यायी व्यवस्था सक्षमपणे सुरु आहे याविषयीही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली.
रस्त्यावरील पडलेली झाडे, पडलेले विजेचे खांब तातडीने काढून तसेच अगदी गावांपर्यंत जाणारे अंतर्गत रस्तेही मोकळे करून वाहतूक सुरु राहील याची काळजी घेण्यास मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनास सांगितले. मच्छिमारांच्या काही बोटींचे नुकसान झाल्याबाबतही त्यांनी माहिती घेतली
परवा पासूनच या चक्रीवादळाचा परिणाम सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांना जाणवू लागला होता. संध्याकाळनंतर तोक्ते चक्रीवादळ किनाऱ्यालागत येऊ लागले तसतसे विशेषत: रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड भागात जोरदार पाऊस, वादळी वारे वाहू लागले तसेच मुंबईत देखील त्याचा परिणाम जाणवू लागला होता. पहाटेपासून तर मुंबईत दक्षिण मुंबई तसेच पश्चिम उपनगरातही जोरदार वारे तसेच मुसळधार पाऊस सुरु झाला. मुंबई महानगरपालिकेने आपत्ती नियंत्रण कक्षाद्वारे या सगळ्यावर लक्ष ठेवले होते तसेच संबंधित यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली
२ हजार ५४२ बांधकामांची  पडझड
या चक्रीवादळामुळे २ हजार ५४२ घरांची अंशत: तर ६ घरांची पूर्ण पडझड झाली आहे. यात ठाणे जिल्ह्यात २४, पालघर ४, रायगड १७८४, रत्नागिरी ६१, सिंधुदुर्ग ५३६, पुणे १०१, कोल्हापूर २७, सातारा ६ अशा पडझड झालेल्या बांधकामांचा तपशील आहे. ठाणे २, रायगड ३, सिंधुदुर्ग १ असे ६ जण मरण पावले आहेत. मुंबईत ४, रायगड आणि रत्नागिरीत प्रत्येकी २ आणि ठाण्यात १ व्यक्ती जखमी आहे. रायगड आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी २ अशी ४ जनावरे मरण पावली आहेत.
मुख्यमंत्र्यांनी सबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांशी चर्चा करून त्यांनाही परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगितले असून कोकण विभागीय आयुक्त तसेच जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी यांच्याकडून मुख्यमंत्री सातत्याने माहिती घेत आहेत.
मुंबईत ३ कोविड केंद्रातील रुग्णांचे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले आहे तसेच मुंबईत पडलेली झाडे व खांब काढण्याचे काम वेगाने सुरु झाले आहे अशी माहिती बृहन्मुंबई पालिकेने दिली. चक्रीवादळामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, याचा परिणाम हवाई वाहतुकीवरही झाला. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन होणारी हवाई वाहतूक थांबवण्यात आली, तसेच रेल्वे वाहतुकीवर झालेल्या परिणामाची माहिती मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांकडून घेतली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे