तोक्ते चक्रीवादळाने रत्नागिरी जिल्ह्यात १०२८ घरांचे नुकसान, ४५६३ लोकांचे स्थलांतर

8
रत्नागिरी, १८ मे २०२१: तोक्ते चक्रीवादळाने किनारपट्टीवरील अनेक भागांमध्ये हैदोस घातलाय. राज्यात अनेक जणांनी या चक्रीवादळात आपला जीव गमावलाय तर मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झालंय. याचा मोठा तडाखा रत्नागिरी जिल्ह्याला देखील बसला. तोक्ते चक्रीवादळानंतर रत्नागिरी  जिल्ह्यात पंचनाम्याचं काम सुरू झालंय. जिल्ह्यात सरासरी १३२.११  मिमी तर एकूण ११८९  मिमी पावसाची नोंद झालीय.
जिल्ह्यात पडलेल्या पावसाची आकडेवारी
 मंडणगड ५२ मिमी , दापोली ८२ मिमी, खेड ४९ मिमी, गुहागर १२० मिमी, चिपळूण १०० मिमी, संगमेश्वर १४२ मिमी, रत्नागिरी २७४ मिमी, राजापूर २०८ मिमी, लांजा  तालुक्यामध्ये १६२ पावसाची नोंद झालीय.
जिल्ह्यात १०२८ घरांचे नुकसान
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रत्नागिरी यांच्याकडून तोक्ते चक्रीवादळाच्या झालेल्या नुकसानीबाबतची  प्राथमिक माहिती (१२ वाजेपर्यंत) पुढीलप्रमाणे आहे.
मंडणगड तालुक्यात २०० घरांचे, दापोली तालुक्यात ३५० घरे, खेड तालुक्यात ३० घरांचे, गुहागर ०५ घरे, चिपळूण ६५ घरे, संगमेश्वर १०२ घरे, रत्नागिरी २०० घरे, राजापूर ३२ असे एकूण जिल्ह्यात १०२८ घरांचे तर रत्नागिरीमध्ये १, लांजामध्ये १ आणि राजापूरमध्ये ०५ असे एकूण ७ गोठ्यांचे नुकसान झालंय.  या चक्रीवादळामध्ये गुहागर येथे १,  संगमेश्वर येथे १, रत्नागिरीमध्ये ३ आणि राजापूरमध्ये ३ असे एकूण ८ व्यक्ती जखमी झाल्या असून गुहागरमध्ये १ बैल, संगमेश्वर मध्ये १ बैल आणि रत्नागिरीमध्ये २ शेळ्या असे ४ पशुधन मृत झाले आहेत.  जिल्ह्यामध्ये ४५० झाडांची पडझड झाली असून १४ दुकानं व टपऱ्यांचे ९ शाळांचे तर २१ शासकीय इमारतींचे नुकसान झालंय.
४५६३ व्यक्तींचे स्थलांतर
वादळामुळं राजापूर तालुक्यात ६५२ व्यक्ती, रत्नागिरी तालुका ३६३, दापोली तालुका २३७३, मंडणगड तालुका ५०८, गुहागर तालुका ६६७ असे एकूण ४५६३ व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले.  सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय रत्नागिरी यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार कोणत्याही मच्छिमार बोटी समुद्रात गेलेल्या नाहीत सर्व बोटी किनाऱ्यावर आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे