नागपुर: संसदेचे हिवाळी अधिवेशन आज दिनांक १८ नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे. आज सुरू होणाऱ्या या अधिवेशनात देशातील विविध समस्यांवर चर्चा केली जाईल. त्यात प्रामुख्याने देशासमोरील आर्थिक संकट, शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढती बेरोजगारी, काश्मीरमधील ‘नाकाबंदी’ तसेच, नागरिकत्व दुरुस्ती विधेयक अशा अनेक मुद्दय़ांवर चर्चा केली जाईल. देशातील या समस्यांवर संसदेमध्ये विरोधक आज भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसे आश्वासनही दिले आहे की, संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये देशातील सर्व समस्यांवर विस्तृत चर्चा केली जाईल.
इलेक्टिक सिगरेटची आयात, उत्पादन, जाहिरात आणि वापरावर केंद्र सरकारने बंदी घातली असून त्यासंदर्भातही वटहुकूम काढलेला आहे. या विषयावर ही संसदेत चर्चा केली जाईल तसेच बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान या शेजारील देशांमधून भारतात आलेल्या मुस्लीम वगळता अन्य धर्मीय ( हिंदी, शीख, पारशी, ख्रिश्चन, बौद्ध, जैन) निर्वासितांना नागरिकत्व देणारे दुरुस्ती विधेयक आणण्याचा विचार केंद्र सरकार करत असून हिवाळी अधिवेशनातच ते संमत केले जाण्याची शक्यता आहे