ट्विटर’नं जम्मू-काश्मीर आणि लडाख नकाशात दाखवला भारताबाहेर, वादानंतर चूक केली दुरुस्त

नवी दिल्ली, २९ जून २०२१: सोशल मीडिया साइट ट्विटर’नं आपल्या वेबसाईटवरून भारताचा चुकीचा नकाशा हटविलाय. पूर्वीच्या नकाशामध्ये जम्मू-काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेशांना भारतापेक्षा वेगळे दर्शविले गेले होते. माध्यमांच्या वृत्तानुसार, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर केंद्र सरकारनं याबाबत दखल घेतली. ट्विटरला नोटीस बजावण्याची तयारी केली. हा वाद आणखी वाढल्यानंतर ट्विटर’नं सोमवारी संध्याकाळी उशिरा आपली चूक सुधारली.

तत्पूर्वी, ट्विटर’नं शुक्रवारी भारताचे कायदा आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांचं खातं एका तासासाठी ब्लॉक केलं. नवीन आयटी कायदा लागू झाल्यापासून केंद्र सरकार आणि ट्विटरमध्ये कायम वाद होत आहेत. आता देशाच्या नकाशावर छेडछाड करण्यावरून एक नवीन वाद उभा राहिलाय.

वापरकर्त्याला आढळला चुकीचा नकाशा

ट्विटरची ही कृती सोशल मीडियावर @thvaranam नावाच्या वापरकर्त्यानं प्रथम लक्षात घेतली. त्यानंतर ट्विटरवरुन जाहीर झालेल्या भारताच्या नकाशाचा फोटो व्हायरल होत आहे. ही पोस्ट २८ जून २०२१ रोजी सकाळी १०.३८ वाजता सामायिक केली गेली.

ट्विटर’नं यापूर्वीही दर्शविला भारताचा चुकीचा नकाशा

ट्विटर’नं भारताचा नकाशा चुकीचा दाखवण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी, ऑक्टोबर २०२० मध्ये, भारताच्या लडाख भागातील लेह हा भाग पीपल्स रिपब्लिक ऑफ चाइना (पीआरसी) चा एक भाग म्हणून घोषित करण्यात आला होता. त्या काळात भारत सरकारने ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेक डोर्सी यांना भारताच्या नकाशावर छेडछाड करण्याचा इशारा दिला होता. आयटी सेक्रेटरी म्हणाले होते की, अशा घटनांमुळं केवळ ट्विटरवर कलंक येत नाही तर मध्यस्थ म्हणून त्याच्या निःपक्षपातीपणावरही प्रश्न उपस्थित होतात.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा