सोनिया गांधींच्या नेतृत्त्वात येत्या २० तारखेला विरोधी पक्षांची बैठक

नवी दिल्ली, १९ ऑगस्ट २०२१: सत्ताधारी मोदी सरकार विरोधात प्रथमच संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक एकत्र येत आक्रमक पवित्रा पहायला मिळाला. संसदेत विरोधी पक्षांनी एकत्र आल्यावर आता ही एकजुट कायम राखत भाजपला घेरण्यासाठी काँग्रेस पक्षाने रणनिती आखली आहे. कारण, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा आणि संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात UPA च्या चेअरपर्सन सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. २० ऑगस्ट अर्थात येत्या शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजता ही बैठक होणार आहे.
काँग्रेसची विचारधारा आणि यूपीएतील घटक पक्ष तसेच समविचारी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांसोबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी बैठक घेणार आहेत. या बैठकीत काँग्रेस प्रणित राज्य सरकारचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह देशातील विरोधी पक्षाची भूमिका बजावणारे अनेक नेते सहभागी होणार आहेत.
मागच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांची अनुपस्थिती
यापूर्वी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर १० एप्रिल रोजी सोनिय गांधी यांनी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली होती. त्या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही हजर राहतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, त्या बैठकीत उद्धव ठाकरे सहभागी झाले नव्हते. त्यानंतर २० ऑगस्ट रोजी होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीला मात्र उद्धव ठाकरे उपस्थित राहतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा