नाशिक, २४ ऑगस्ट २०२१: सध्या नारायण राणे राज्यभर जन आशीर्वाद यात्रा करत आहेत. १९ तारखेपासून सुरू केलेल्या आपल्या या जन आशीर्वाद यात्रेची सुरूवात त्यांनी बाळासाहेब ठाकरे स्मारकाला वंदन करून सुरू केली. मात्र यानंतर शिवसैनिकांनी स्मारकावर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केले. यानंतर नारायण राणे सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल पातळी सोडून वक्तव्य करत आहेत. नुकतेच त्यांनी केलेल्या विधानावरून ते आता अडचणीत सापडल्याचे दिसत आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी हीरक महोत्सव हा शब्द वापरला होता. त्यावरून नारायण राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता.
या वक्तव्यावरुन युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी याविरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर नाशिक पोलीस आयुक्तांनी नारायण राणे यांना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता नाशिक पोलिसांचे पथक नारायण राणे यांना अटक करण्यासाठी चिपळूणच्या दिशेने रवाना झाले आहे.
मुख्यमंत्र्यांबाबत बदनामीकारक वक्तव्य करणे, समाजात शत्रुत्व आणि द्वेषाची भावना निर्माण करणे, राज्यात विविध गटांत तेढ निर्माण होईल असं वक्तव्य करणे, मुख्यमंत्र्यांवर बलप्रयोग करण्यास प्रवृत्त होतील असे वक्तव्य करणे यासारखे आरोप राणेंवर ठेवण्यात आले आहेत. नाशिक सायबर पोलीस स्टेशनमध्ये नारायण राणे यांच्याविरोधात कलम ५००, ५०५ (२), १५३-ब (१) (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नारायण राणे यांच्याविरोधात कुठे कुठे गुन्हे दाखल?
रायगड
महाड
नाशिक
औरंगाबाद
पुणे
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे