महाड;२४ ऑगस्ट २०२१:अवघे ४९ दिवस झाले आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंत्री पदाचा गैरवापर केला. मुख्यमंत्र्याबाबत “ते” विधान केलं आणि त्यांना ते भोवलं. त्याचाच परिणाम म्हणून आज त्यांना अटक झाली. त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील त्या विधानामुळे अवघा महाराष्ट्र पेटून उठला आहे. सांगली, महाड, नाशिक, पुणे, चिपळून, औरंगाबाद, उल्हासनगर सगळीकडे शिवसेना विरुद्ध भाजप संघर्ष पेटला. पण त्यामुळे कुठेतरी भाजपची मान मात्र खाली गेली. शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आणि अखेरीस नारायण राणे यांनी महाड पोलिसांकडून अटक करण्यात आली. यावेळी नारायण राणे यांना पोलिसांकडून धक्का-बुक्की करण्यात आली. कालपासून सुरु झालेला हा संघर्ष अखेरीस महाड पोलिस स्टेशनातल्या अटकेपर्यंत येऊन पोहोचला. मात्र त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्याला दंगलीचे स्वरुप आले आहे. अनेक ठिकाणी राणेंना काळे झेंडे दाखवण्यात आले तर त्यांच्या विरोधाचे पोस्टर झळकवण्यात आले.
नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार नारायण राणेंना महाडच्या पोलिसांनी अटक केलं असून त्यांच्यावर कलम ५००, ५०२, १५३ अंतर्गत समाजात द्वेषाची भावना निर्माण करणे, लोकांना चिथवणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यांना दिवाणी न्यायालयात त्यांना हजर करुन त्यांच्यावरील कागदपत्रांची पूर्तता करण्यात येईल. जेणेकरुन त्यांना जामिन मिळेल. मात्र ही कलमं अजामिनपात्र असल्यामुळे त्यांच्या कोठडीत नक्कीच वाढ होऊ शकले. त्यांना उद्या सत्र न्यायालयात हजर करण्यात येईल. पोलिसांना या कलमांचे उद्या स्पष्टीकरण द्यावे लागेल. जर त्यांना आज जामिन नाही मिळाला तर मात्र आजची रात्र त्यांना कोठडीत घालवावी लागेल. उद्याच्या युक्तीवादानंतर त्यांना दिलासा मिळेल का नाही हे आता पहावं लागेल. नारायण राणे हे मोदी मंत्रीमंडळातील ते पहिले मंत्री आहे, ज्यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे कुठेतरी याचे परिणाम भाजपला आणि त्यामुळे मोदी सरकारला भोगावे लागतील. ज्याची झळ २०२४च्या निवडणुकीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान महाडमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर दगडफेक केल्याचा भाजपच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे. तर शिवसेनेच्या गाड्या पोलिसांकडून का अडवली जात नाही असा सवाल भाजपाकडून करण्यात येत आहे. तर नारायण राणेंना अटकेवेळी त्यांना धक्काबुक्की करण्यात आली असून त्यांना वॉरंट न दाखवता अटक केल्याचा आरोप प्रसाद लाड आणि नितेश राणे यांनी केला आहे.
यावर प्रतिक्रीया देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस यांनी सांगितले की, आम्ही राणेंच्या वक्तव्याचं समर्थन करत नाही पण शिवसेनेच्या भूमिकेला नक्कीच विरोध करतो. सरकार सत्तेचा दुरुपयोग करत आहे. त्यांची शैली असून मग ठाकरेंच्या दस-या मेळाव्यातील भाषणांवर गुन्हे दाखल झाले पाहिले असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
राज्यातला संघर्ष पाहून मातोश्री बंगल्यावर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अनेक ठिकाणी दगडफेक झाल्याने पोलिसांना बळाचा वापर करावा लागला आहे. त्यात अनेक पोलिस जखमी झाले.
अखेरीस शिवसेना विरुद्ध भाजप हा दोन दशकांचा हा संघर्ष आज चव्हाट्यावर आलाय. आता याचे पडसाद काय पडतील हे मात्र नक्कीच उद्याचा दिवस ठरवेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस,