मुंबई, 24 सप्टेंबर 2021: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेलं ओबीसींसाठीचं राजकीय आरक्षण अखेर सत्यात उतरताना दिसू लागलं आहे. ओबीसी आरक्षणाबाबत महाविकास आघाडीनं पाठवलेल्या सुधारित अध्यादेशावर अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळं आता राज्यात ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी अध्यादेशावर सही केल्यानंतर आता त्याचं कायद्यात रुपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यापूर्वी राज्य सरकारने अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर तो राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. मात्र, काही सूचनांसह तो अध्यादेश राज्यपालांनी पुन्हा पाठवला होता. त्यानंतर राज्यपालांच्या भूमिकेवर महाविकास आघाडीतील नेत्यांनी जोरदार टीका केली होती. यानंतर राज्य सरकारनं त्यात आवश्यक ते बदल करून राज्यपालांकडं पाठवल्यानंतर काल राज्यपालांनी त्यावर स्वाक्षरी करून आपल्या मंजुरीची मोहोर उमटवलीय.
अध्यादेशावर राज्यपालांनी स्वाक्षरी केल्यानंतर आता त्याचं कायद्यात रुपांतर होऊ शकतं. हा अध्यादेश कायमस्वरुपी पुढे न्यायचा असेल तर तो विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करावा लागेल. मात्र, आता महापालिका निवडणुकांच्या तोंडावर तीन महिने हा अध्यादेश लागू असणार आहे. त्यामुळे आता ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे