मुंबई, 8 ऑक्टोंबर 2021: महाराष्ट्रात आज दिवसभर चर्चा राहिली ती अजित पवार आणि त्यांच्या बहिणी आणि निकटवर्तीयांवर आयकर विभागानं टाकलेल्या झडतीची. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी, पार्थ पावर यांच्या मुंबईतील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाकडून छापे टाकरण्यात आले. अजित पवार यांच्या नातेवाईकांवर देखील छापेमारी सुरु आहे. यामध्ये अजित पवार यांच्या तीन बहिणींचाही समावेश आहे.
ह्या सगळ्या घडामोडींवर राज्यातलं राजकारण तापलेलं असतानाच पहिल्यांदाच दिल्लीतून आयकर विभागानं प्रेस नोट जारी केलीय. ह्या प्रेस नोटमध्ये नेमक्या कुणाच्या घरी धाडी टाकल्या किंवा अजित पवार यांचा, किंवा नातेवाईकांचा असा कुणाच्याही नावाचा उल्लेख नाही. पण गेल्या 6 महिन्यांपासून आयकर विभाग काय करतंय, त्यांना कुठल्या व्यवहाराची माहिती मिळालीय, ते व्यवहार किती कोटींचे आहेत, यात कोण आहेत, कुठले कोडनेम आहेत, याची थोडक्यात माहिती दिलीय.
आयकर विभागाने एक सर्च ऑपरेशन 23 सप्टेंबर 2021 रोजी राबविले. यात महाराष्ट्रातील काही व्यवसायिक, दलाल आणि उच्च पदांवर असलेले जनसेवक यांचा समावेश होता. सुमारे 6 महिने प्राप्त होत असलेल्या गुप्त माहितीच्या आधारावर या धाडी टाकण्यात आल्या. 25 निवासी आणि 15 कार्यालय परिसरांवर या धाडी टाकण्यात आल्या. 4 कार्यालयांचा सुद्धा यात समावेश होता. हॉटेल ओबेरॉयमध्ये कायमस्वरूपी बुक करण्यात आलेले काही सुट सुद्धा यात समाविष्ट आहेत. दोन दलाल याठिकाणी सातत्याने ग्राहकांना भेटत होते. यात अनेक कोड वापरून नोंदी असून एक केसमध्ये तर 10 वर्ष जुनी नोंद आहे. यात जे व्यवहार आढळून आले ते 1050 कोटी रूपयांचे आहेत.
ह्या सर्व व्यवहारात दलालांनी कार्पोरेट, उद्योगपतींना एन्ड टू एन्ड सेवा पुरवलीय. त्यात मग जमीन संपादन असो की सरकारी क्लिअरन्स. व्यवहार करण्यासाठी मध्यस्थांनी कधीही उघड होणार नाही अशा संवाद प्रणालीचा वापर वापर केला पण तरीही आयकर विभागाच्या हाती काही महत्वपूर्ण डिजिटल डेटा लागलेला आहे, तो मिळवण्यात यश आलंय. झडतीच्या दरम्यान एका लपण्याच्या जागेचाही शोध लागला आणि तिथूनही काही महत्वपूर्ण पुरावे हाती लागलेत. व्यवहातल्या पैशांच्या ट्रान्सफरसाठी आंगडीयांचाही वापर करण्यात आलाय. अशाच एका शोध मोहिमेत एका आंगडीयाकडून दीड लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आलीय.
या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यश शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले, “आज जे काही घडलं ते उत्तर प्रदेशच्या प्रश्नावर माझ्यासह विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे घडत आहे. शेतकरी आपली भूमिका मांडण्यासाठी जात असताना सत्ताधारी पक्षातील नेत्यांची वाहनं त्यांच्या अंगावर जातात. त्यात शेतकरी चिरडून ठार होतात. हे यापूर्वी कधी घडलं नव्हतं. या घटनेचा सर्वांनी निषेध व्यक्त केला. महाराष्ट्र सरकारनेही मंत्रिमंडळ बैठकीत निषेध व्यक्त केला. मी सुद्धा याबाबत तीव्र भूमिका व्यक्त केली. लखीमपूरच्या घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली. त्याचा संताप किंवा राग सत्ताधारी पक्षातील लोकांना आला. त्याची प्रतिक्रिया म्हणून आज हे सुरु असल्याची शक्यता आहे”.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे