पुणे, 10 ऑक्टोंबर 2021: पुणे शहरात शनिवारी सायंकाळनंतर ढगांच्या गडगडाटासह झालेल्या जोरदार पावसाने पुणेकरांची दाणादाण उडवली. सायंकाळी सहानंतर पुण्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. शहराच्या मध्यवस्तीसह उपनगरांना पावसाने झोडपून काढले. अवघ्या तासा-दीड तासाच्या जोरदार पावसामुळे रात्री साडेआठपर्यंत 49.2 मिमी पावसाची नोंद वेधशाळेत झाली. धानोरी, वडगाव शेरी, विश्रांतवाडीसह पुण्याच्या पूर्व भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली त्यामुळे वाहतूक ठप्प झाली, सोसायट्यांचे पार्किंग वस्त्यांमधील घर, दुकानांमध्ये पाणी शिरल्याने हाहाकार उडला.
शनिवारी सायंकाळी पुण्याच्या लोहगाव, वडगाव शेरी, धानोरी, हडपसर, फुरसुंगी यासह इतर भागात मुसळधार पावसाला सुरवात झाली. अवघ्या दोन अडीच तास झालेल्या या पावसाने पुण्यातील सर्व रस्ते ओसंडून वाहू लागले होते. सोसायट्यांचे पार्किंग मध्ये चार पाच फुटापेक्षा जास्त पाणी जमा झाले, वाहने पाण्यात बुडाली. महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, येरवडा, टिंगरे नगर, लोहगाव येथेही पावसाचा फटका बसला.
विमाननगर, धानोरी, येरवडा, नागपूर चाळ, विश्रांतवाडी परिसरात सखल भागांतील घरांमध्ये पाणी शिरले. घटनांमुळे पुणेकरांना पुन्हा एकदा दोन वर्षांपूर्वी झालेल्या भीषण पावसाची आठवण झाली. शहरात दिवसा ऊन होते, तर दुपारनंतर हवामान ढगाळ झाले. सायंकाळी पाचच्या सुमारास शहराच्या वेगवेगळ्या भागात पाऊस पडायला सुरुवात झाली. उपनगरांतील येरवडा, धानोरी, नगर रस्ता, कात्रज, धनकवडी, आंबेगाव, सिंहगड रस्ता अशा भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत होता. मध्यवस्तीतील कसबा पेठ परिसरातही जोराचा पाऊस झाल्याचे दिसून आले. सुमारे तीन ते चार तास पाऊस पडत असल्याने नागरिकांची दाणादाण उडाली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे