पुण्यात इयत्ता आठवीतील मुलीची कोयत्याने वार करून हत्या…

पुणे, 13 ऑक्टोंबर 2021: पुण्यातील गुन्हेगारी घटनांची मालिका सुरूच आहे. मागील काही दिवसांमध्ये विविध गुन्हेगारी घटना घडल्यानंतर आता पुन्हा एकदा पुणे एका घटनेमुळे हादरले आहे.  पुण्यातील बिबवेवाडी येथे एका अल्पवयीन मुलीची क्रूरपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. नात्यातील व्यक्तीनेच या मुलीवर कोयत्याने वार करुन तिचा खून केलाय. इयत्ता आठवीमध्ये शिकणारी ही मुलगी कबडीपट्टू होती. एकतर्फी प्रेमातून हे कृत्य केले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. हृषिकेश भागवत असे आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे आजूबाजूला छोटी मुलं आणि व्यायाम करणारे नागरिक असतानादेखील आरोपीने हे धाडस केलं आहे. समोर मुलीची हत्या होत असताना छोटी मुलं आजूबाजूला खेळत होती. तर अन्य नागरिकांनी घटनास्थळारुन थेट पळ काढला. या हत्याकांडामुळे पुण्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.
या घटनेबद्दल पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेली मुलगी इयत्ता आठवी वर्गात शिकत होती. हत्या करणारा आरोपी हा मृत मुलीचा नातेवाईकच आहे. या आोरपीसोबत अन्य दोन व्यक्ती होते. हत्येआधी मुलगी बिबवेवाडी परिसरात कबड्डीचा सराव करत होती. यावेळी तिचा नातेवाईक तसेच इतर दोघे तिच्याकडे आले. यातील एकाने तिच्यावर कोयत्याने अचानकपणे वार करायला सुरुवात केली. यातच अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हा अत्यंत रागामध्ये अल्पवयीन मुलीकडे आला होता. मुलगी कबड्डी खेळण्यात मग्न होती. मात्र आरोपीने मुलीवर कोयत्याने सपासप वार केले. थेट मानेवर वार केल्यामुळे काही समजायच्या आत मुलगी जमिनीवर कोसळली. त्यानंतर आरोपीने फक्त मानेवरच आणखी वार केले. आरोपीने अत्यंत अमानुषपणे मुलीचा खून केला. तसेच या मुलीचे डोके धडापासून वेगळे करण्याचा मानस या ओरपींचा होता की काय ? अशी शंका अपस्थित केली जात आहे.
यानंतर जखमी अवस्थेतील त्या मुलीला  रूग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र  तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. एकतर्फी प्रेमातून हे कृत्य केले असावे, असा अंदाज असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच या घटनास्थळी आम्हाला पिस्तूल देखील आढळून आल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा