भोपाळ, 25 ऑक्टोंबर 2021: भोपाळमध्ये वेब सीरिज आश्रम -3 च्या शूटिंग दरम्यान बजरंग दलाचे कार्यकर्ते चित्रपट निर्माते प्रकाश झा यांच्यासोबत झटापट केली. कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाई फेकली. जुन्या तुरुंगात (अरेरा हिल्स) शूटिंग चालू होते. कार्यकर्त्यांनी तुरुंगाच्या आवारात वेब सिरीज टीमच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. व्हॅनिटी व्हॅनसह 5 वाहनांची तोडफोड केली. या हल्ल्यात 4 ते 5 कर्मचारी जखमी झाले. काही पत्रकारांनाही मारहाण करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून कार्यकर्त्यांना पांगवले.
या संपूर्ण प्रकरणात प्रकाश झा यांनी पोलिसांकडे तक्रार करण्यास नकार दिला आहे. ते मीडियासमोरही दिसले नाही. निदर्शक बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी झा यांच्यावर आश्रम-3 वेब सिरीजद्वारे हिंदू धर्माची बदनामी केल्याचा आरोप केला. त्यांना चित्रपटाचे नाव बदलावे लागेल, अन्यथा भोपाळमध्ये शूटिंग होऊ देणार नाही. या घटनेवेळी वेब सीरिजचा अभिनेता बॉबी देओलही उपस्थित होता.
वेब सीरिज आश्रम -3 च्या जुन्या तुरुंगात रविवारी संध्याकाळी 6 वाजता शूटिंग चालू होते. दरम्यान, घोषणा देत बजरंग दलाचे अडीचशे कार्यकर्ते कारागृहाच्या आवारात दाखल झाले. कार्यकर्ते गडबड करू लागले. त्यांनी प्रकाश झा यांना बोलण्यासाठी बोलावले. यादरम्यान संतप्त कार्यकर्त्यांची झा यांच्याशी बाचाबाची झाली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना कसेतरी कार्यकर्त्यां पासून वेगळे केले. यानंतर आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी व्हॅनिटी व्हॅन, कार, ट्रकमध्ये ठेवलेले सामान, आवारात उभ्या असलेल्या मशिनरींची तोडफोड सुरू केली. चित्रपटाच्या टीमच्या कर्मचाऱ्यांनी विरोध केल्यावर त्यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पोलीस प्रतिबंधात्मक कारवाई करत असल्याची चर्चा आहे.
पोलीस अधिकारी बॉबी, प्रकाश झा यांच्याशी बोलले
या घटनेनंतर जुन्या कारागृहात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा ताफा पोहोचला. पोलीस अधिकाऱ्यांनी बॉबी देओल, प्रकाश झा यांची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली. मात्र, झा यांनी पोलिसांकडे तक्रार करण्यास नकार दिला. डीआयजी इर्शाद वाली म्हणाले की झा यांच्या बाजूने आजपर्यंत कोणतीही तक्रार आलेली नाही. दंगलखोरांवर कडक कारवाई केली जात आहे. गोंधळ घालणाऱ्यांची काही नावे पोलिसांना समोर आली आहेत. लवकरच अटक करण्यात येईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे