एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे! प्रमुख मागण्या राज्य शासनाने केल्या मान्य

मुंबई, 29 ऑक्टोंबर 2021: ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेण्यात आला आहे. एसटी कामगारांना 28 टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता देण्याचं राज्य सरकारकडून मान्य करण्यात आलं आहे. गेले काही तास राज्यात विविध ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरु केलं होतं. हे आंदोलन करत एसटी वाहतूक सेवाही बंद ठेवण्याचा पवित्रा कर्माचाऱ्यांनी घेतला होता. यामुळे राज्यातील 150 पेक्षा जास्त एसटी महामंडळाच्या आगारातून एकही एसटी बाहेर पडली नव्हती.
परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कामगार संघटनांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या महत्वाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या एकुण तीन मागण्या होत्या. नव्या वेतन करारानुसार महागाई भत्ता, घरभाडे भत्ता वाढवून द्यावा या दोन प्रमुख मागण्या होत्या. तर वेतन करारातील पगारवाढीचा  ( increment ) चा मुद्दा आहे त्यावर दिवाळीनंतर चर्चा करण्यात येईल असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलं आहे. तेव्हा या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे असंही आवाहन परब यांनी केलं.
एसटी कामगारांना 28 टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता देण्याचे मान्य करण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर एसटी कामगारांचे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय एसटी कामगार संघटनांनी घेतलाय. या निर्णयानंतर 28 कोटी महागाई भत्ता आणि 2 कोटी घरभाडे असा 30 कोटी रुपयांचा भार एसटी महामंडळावर दरमहिना पडणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा