पुणे, 15 नोव्हेंबर 2021: गेल्या तीन दिवसांपासून बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती खालावली होती. न्यूमोनियाचा संसर्ग झाल्यानं त्यांना पुण्यातील दिनानाथ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सोमवारी पहाटे 5 वाजून 7 मिनिटांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झाल्याची माहिती दीनानाथ मंगशेकर रूग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे. ते 100 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात चिरंजीव अमृत आणि प्रसाद तसेच कन्या माधुरी असा परिवार आहे. त्यांच्या सर्वच परिवाराने वेगवेगळ्या क्षेत्रांत नावलौकिक कमावला आहे.
रुग्णालयाने जारी केलेल्या पत्रकानुसार पहाटे 5 वाजून 7 मिनिटांनी बाबासाहेबांचं निधन झालं. “आदरणीय पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे रुग्णालयात उपचार घेत असताना वृद्धापकाळाने आज दिनांक 15 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 5 वाजून 07 मिनिटांनी दु:खद निधन झाले. त्यांचे पार्थिव सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी त्यांच्या पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात येईल. अंत्यसंस्कार सकाळी 10 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत केले जातील,” असं दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय.
बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी झाला. त्यांचे मुळ नाव बळवंत मोरोपंत पुरंदरे होते. मात्र, प्रेमापोटी त्यांना बाबासाहेब असं म्हटले जाऊ लागले. बाबासाहेबांनी शिवचरित्रावर देश-विदेशात सुमारे 12 हजारांपेक्षा अधिक व्याख्यानं दिली. तर, जवळपास सात दशके त्यांनी इतिहास संशोधनाचे कार्य केले.
महाराष्ट्र सरकारने त्यांना सन 2015 मध्ये राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण देऊन गौरव केला होता. इतिहास संशोधनात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांचा पद्मविभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे