किल्ल्यांनी जपला…ऐतिहासिक वारसा

                                                 किल्ले संतोषगड

“सह्याद्रीची मुख्य डोंगर रांग प्रतापगडापासून तीन भागांमध्ये विभागली गेलेली आहे. शंभूमहादेव रांग, बामणोली रांग आणि म्हसोबा रांग या रांगा उभ्या आहेत. म्हसोबा डोंगर रांगेवर संतोषगड, वारुगड, महिमानगड आणि वर्धनगड हे किल्ले आहेत. हा सर्व परिसर तसा कमी पाऊस असलेलाच आहे. या सर्व ठिकाणी वीज, दूरध्वनी अशा आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.”

संतोषगडावर जाण्यासाठी फलटण आणि सातारा या दोन्ही शहरातून जाता येते. संतोष गड हा तीन भागात विभागलेला आहे. पहिल्या टप्प्यावर संरक्षक तटबंदी, दुसऱ्या टप्प्यात माचीचा भाग व तिसऱ्या टप्प्यात सर्वात वरचा बालेकिल्ल्याचा भाग आहे.

संतोषगड हा छोटासा किल्ला आहे.परंतु तटबंदी, बुरुंज असे बरेच काही पाहण्यासारखे आहे. या गडावरून बऱ्याच दूरपर्यंत नजर ठेवता येते. डोंगरावर सन १७६२मध्ये किल्ल्याचा जीर्णोद्धार झाल्याची माहिती आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी एक मठ आहे. या मठाच्या बाजूला एक गुहा आहे. या गुहेत थंड पाण्याचा साठा आहे. याठिकाणी एक वाल्मिकी ऋषींची मूर्ती देखील आहे.

विसापूर वरून होणाऱ्या स्वार्यांना पायबंद बसावा तसेच स्वराज्याची ही बाजू मजबूत असावी यासाठी या परिसरात शिवछत्रपतींनी संतोषगड आणि वारुगड हे शिलेदार उभे केले. आग्रा मोहिमेच्यावेळी वारुगडाचे ठाणेही शिवाजी महाराजांनी जिंकल्याचेही सांगितले जाते. पुढे ते पेशवाईनंतर इंग्रजांच्या ताब्यात गेले. किल्ले इंग्रजांच्या ताब्यात गेल्यानंतर त्यांनी महाद्वाराच्या कमानी पाडल्या. भग्न अवशेषांमध्ये इथला इतिहास जरी विखुरलेला असला तरी त्याच्याकडे डोळसपणे पाहिले तर तो डोळ्यासमोर उभा रहातो. दोन्ही गडांवरून प्रचंड मोठा मैदानी प्रदेश दृष्टीक्षेपास येतो. दुष्काळात आजही या दोन्ही गडावरील पाणीसाठा गावासाठी उपयोगी येतो.

संतोषगड हा महाराजांनी सभोवताली असणाऱ्या भल्या मोठया विखुरलेल्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी उपयोगी ठरत होता. त्यामुळे स्वराज्याच्या दृष्टीने संतोषगड महत्वाचा मानला जातो.

                                                                                                            -प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा