राज्य सरकार एसटीबाबत मोठ्या निर्णयाच्या तयारीत! एसटीचं खासगीकरण होणार?

मुंबई, 19 नोव्हेंबर 2021:  कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपावरुन राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे.  तर दुसरीकडं विलिनीकरण शक्य नसल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह सत्ताधारी महाविकास आघाडीतील अनेक नेते म्हणत आहेत. संपाचा तिढा कायम असताना एसटीचा खासगीकरणाकडे प्रवास सुरू असल्याचे संकेत आहेत.
कोरोनाची साथ आणि निर्बंधांमुळे गेल्या वर्षांपासून प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर देणेही मंडळासाठी अवघड बनले. त्यात नुकताच दिवाळीसारखा महत्त्वाचा सण घेऊन गेला. सणासुदीला तरी वेतन मिळेल अशी एसटी कर्मचाऱ्यांची अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा देखील धुळीला मिळाल्याचे दिसले. यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला. त्यामुळे महामंडळाला प्रवासी उत्पन्नावर पाणी सोडावे लागले.
कोरोना चा अपघात आणि एसटी प्रवाशांची कमी होत असलेली संख्या आणि आता नुकताच सुरू केलेल्या संपामुळं एसटीचं आर्थिक चाक आणखी खोलात रुतलं. एसटीचे वार्षिक प्रवासी उत्पन्न सात ते आठ हजार कोटी रुपयांपर्यंत आहे. मात्र, त्या तुलनेने खर्च अधिक असल्यामुळे एसटीची आर्थिक स्थिती खालावत गेलीे. या पार्श्वभूमीवर एसटीला तोटय़ातून नफ्यात आणण्यासाठी महामंडळ पर्याय शोधू लागले असून, आता खासगीकरणाचा विचार करण्यात येत आहे.
एसटीचे खासगीकरण होऊ शकतं का? याबाबत महामंडळानं कमिटी नियुक्त करुन अभ्यास अहवाल सादर करण्यास सांगितल्याची माहिती मिळतेय. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळाने एसटीचे विलिनीकरण करण्यापेक्षा खासगीकरण होऊ शकतं का, याबाबत महामंडळाने एक कमिटी नियुक्त केलीय. एसटीच्या शिवनेरीच्या खासगी बस एसटी महामंडळाच्या सेवेत कार्यरत आहेत. तशाच पद्धतीच्या हजार खासगी गाड्या घेऊन एसटी महामंडळाचा तोटा भरुन निघू शकतो का? याबाबत या कमिटीला आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. उत्तर प्रदेशात हाच खासगीकरणाचे मॉडेल राबवण्यात आले आहे. त्याचाही अभ्यास या कमिटीला करण्यास सांगण्यात आल्याची माहिती मिळतेय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा